अमरावती ; ‘आपले गाव आपला विकास’अंतर्गत ग्रामपंचायतींचे सन २०२१-२२ चा गावविकास आराखडा ‘प्लॅन प्लस पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश सीईओंनी बीडीओंमार्फत सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. याकरिता १५ मार्चची डेडलाईन दिली असून, मुदतीत आराखडा अपलोड न केल्यास जबाबदार संबंधितांवर प्रशासकीय कारवाईचा इशारासुद्धा दिला आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत ८४० ग्रामपंचायतींना ‘आपला गाव आपला विकास’ अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे गाव विकास आराखडा तयार करण्याो आदेश यापूर्वीचे जिल्हा परिषद पंचायत विभागाने सीईओंच्या आदेशानुसार दिले आहेत. अशातच याच कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात. सोबतच कोरोनामुळे ग्रामसभा व मासिक बैठकीही होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी विकास आराखडे ग्रामसभा व मासिक बैठकीच्या ठरावाअभावी होऊ न शकल्याने विकास आराखडे अपलोड करण्याचे काम थंडबस्त्यात पडले होते. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुका व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आदींनी कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावविकास आराखड्याचे रेंगाळलेले काम तातडीने मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ ते ३० ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अपलोड झालेले आहेत. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अद्याप अपलोड केलेले नाही त्या ग्रामपंचायतींनी येत्या १५ मार्चपर्यंत गावविकास आराखडे प्लॅन प्लस पोर्टलवर अपलोड करावे, असे निर्देश सीईओंनी दिले आहेत.
कोट
आपले गाव आपला विकास अंतर्गत ग्रामपंचायतींचे सन २०२१-२२ चे गाव विकास आराखडे प्लॅन प्लॅस पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याकरिता १५ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत जे आराखडे अपलोड करणार नाही, अशांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई केली जाईल.
- अमोल येडगे,
मुख्यकार्यकारी अधिकारी