दुष्काळात तेरावा महिना, आंबिया बहराकरिता रक्कम झाली तिप्पट, संत्राबागायतदार आर्थिक अडचणीत
चांदूर बाजार : प्रधानमंत्री पीक वीमा योजनांतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा संत्रा पिकाचा आंबिया बहर तिप्पट महागला आहे. यामुळे विमा कंपनीतर्फे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप केला जात आहे.
सध्या चोहोबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट, गारपीट, संत्रा फळगळ, विविध प्रकारचे रोग यामुळे शेतकरी अगोदरच विवंचनेत आहे. असे असताना २०२१-२२ प्रधानमंत्री पीक विमा आंबिया संत्रा बहरच्या विमा रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. विमा योजनेत वाढ झाल्यामुळे संत्रा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.
दरवर्षी अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आपला विमा प्रति हेक्टर ४ हजार रुपयाप्रमाणे काढत होते. मात्र यंदा ही रक्कम ४ हजारवरून तब्बल १२ हजार रुपये प्रतिहेक्टर भरावी लागणार आहे, असे नुकतेच प्रसिध्द झालेल्या परिपत्रकात नमूद केल्याची माहिती शेतकरी जिल्हा विमा प्रतिनिधी पुष्पक खापरे यांनी दिली. २०२० -२१ पर्यंत संत्रा विमा रक्कम प्रति हेक्टरी ४ हजार रुपये होती. तर विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये होती. आता शासनाने संत्रा विमा रक्कम १२ हजार रुपये केली आहे.
शेतकरी हिस्सा १२ हजार असताना ८० हजार रुपये प्रति हे्क्टर संरक्षित रक्कम मिळणार आहे. तसेच गारपीट विम्यासाठी १३३३ रुपये प्रति हेक्टरी शेतकरी हिस्सा वेगळा भरावा लागनार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. अशी एकूण १३ हजार ३३३ रुपये शेतकऱ्याच्या हिश्यावर भरावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ हजार रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकरी पीक विमा हिस्सा लागू करण्यात आला आहे.
कोट
शेतकरी आर्थिक परिस्थितीने अडकलेला असताना खाजगीकरणाच्या नावाखाली विमा कंपनीमार्फत लुटण्याचे काम सुरू आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना लक्षात घेऊन विमा हप्ता कमी करावा. शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा
- पुष्पक खापरे, शेतकरी जिल्हा विमा प्रतिनिधी, चांदूर बाजार