(पान ४ साठी/ फोटो घेणे)
अमरावती : शहराच्या पूर्वेकडील जुने बायपासलगतच्या ऑक्सिजन पार्क हिरवळीने बहरले असून, येथे वड, पिंपळ, चिंच, निम, मेाह, बेहडा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करणारी वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोना परतला असताना नागरिकांसाठी ऑक्सिजन पार्क खुले करून मोकळा श्वास घेऊ द्या, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी केली आहे.
सुनील देशमुख यांच्या संकल्पनेतून ७ जुलै २०१७ रोजी वनविभागाच्या जागेवर ऑक्सिजन पार्कची पायाभरणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आली होती. आता चार वर्षांनंतर येथील झाडे चांगली बहरली आहे. तीनही बाजूंनी विस्तीर्ण रुंद रस्ता लगतच टुमदार हिरवीगार टेकडी आणि या टेकडीच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात सुंदर असे ऑक्सिजन पार्क नुसते कल्पनेनेच मन हिरवेगार होते. वर्षभरापासून पूर्णत्वास आल्यानंतरही कॉरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा ऑक्सिजन पार्क निसर्गप्रेमींसाठी अद्यापही खुला झालेला नाही. आता संचारबंदीत शिथिलता आल्याने केवळ उद्घाटन झाले नसल्याने नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. म्हणून उद्घाटनाची औपचारिकता न करता आता तरी ऑक्सिजन पार्क नागरिकांसाठी खुला करावा, अशी आग्रही मागणी सुनील देशमुख यांनी केली आहे. ऑक्सिजन पार्कसाठी १४ व्या वित्त आयोगातून ४५ लाख रुपये संरक्षण कुंपण आणि वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास या योजनेंतर्गत अडीच कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने उपलब्ध करून देण्यात आला होता.
००००००००००००००००००००
ही आहेत ऑक्सिजन पार्कची वैशिष्टे
या ऑक्सिजन पार्कमध्ये नागरिकांना सकाळ, संध्याकाळ भ्रमंतीकरिता निसर्ग पाऊलवाट, विश्रांतीसाठी छोटेखानी पॅगोडा, एका भागात छोटेशे कॅक्टस गार्डन, उद्यान व लगतच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी वॉच टॉवर, लहान-लहान वॉटर बॉडी, लहान मुलांसाठी बालोद्यान, ओपन जिमचे साहित्य, उद्यानात सोलर लाईटची व्यवस्था, सुंदर व स्वच्छ रस्ते लक्ष वेधून घेणारे आहे.
---------------