पत्रपरिषद : मुन्ना राठोड यांची माहिती अमरावती : ओपन कॅटेगिरी फोरममधील सहभागी असलेल्या समाजाला २६ टक्के खुला संवर्गातून आरक्षण देण्यात यावे व इतर मागण्यांबबात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओपन कॅटगिरी फोरमचे पदाधिकारी मुन्ना राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राठोड म्हणाले, मागील वर्षी अमरावतीत ओपन कॅटेगिरी फोरमची स्थापना केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर फोरमचे काम सुरू आहे. यामध्ये देशभरातील नागरिक सहभागी होत आहेत. ओपन कॅटेगिरी फोरममध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, मराठा, मुस्लिम, राजपूत, जैन, रेडडी, जाट, गुजर, पटेल, सिंधी, माहेश्र्वरी, अग्रवाल, लोहाणा, कापु, दोकालिंगा, पंजाबी, गुजराथी, भूमीहार, कायस्थ आदी समाज बांधव फोरममध्ये सहभागी आहेत. यात सर्व जाती, जमातींचा सक्रीय सहभाग असून या सर्व समाज बांधवाना एकत्र आणून प्रभावीशाली आणि जागृत संघटना म्हणून काम करत आहे. त्यामुळे फोरममधील समाजाला २६ टक्के खुल्या संवर्गातून आरक्षण देण्यात यावे, प्रतियोगिता परीक्षेमध्ये या संवर्गातील परीक्षार्थीना वयामध्ये सूट देण्यात यावी, प्रतियोगिता परीक्षेच्या शुल्कामध्ये सूट देण्यात यावी, प्रतियोगिता परीक्षेसाठी फ्री रेल्वे पासेस उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, विद्यार्थ्यांना ग्रंथालय आणि वसतिगृहाची सोय करून देण्यात यावी, खुला संवर्ग आर्थिक महामंडळ स्थापन करावे, प्रतियोगिता स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्व तयारीकरिता शिकवणी वर्ग सुरू करावे आदी मागण्यांसाठी आमचा लढा असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. अन्य जाती जमातींना मिळणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्या आरक्षणाला धक्का न लावता. २६ टक्के आरक्षण वरील जातींना आर्थिक आधारावर देण्याची आमची मागणी आहे. मागील वर्षभरात हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्ये आर्थिक आधारावर संवर्ग जातीचे आरक्षण लागू केले आहे. यामुळे तेथील नागरिकांना बरीच मदत मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. काही राज्यांत या समाजासाठी वेलफेयर स्किम सुरू आहेत. महाराष्ट्र शासनानेही वरील राज्याच्या अनुषंगाने राज्यात ओपन कॅटेगिरीमधील वरील संवर्गांना न्याय द्यावा, अशी मागणी फोरमने केली आहे. शासनाने वरील मागण्या मान्य कराव्यात आणि राजकीय पक्षांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा नोव्हेबर २०१६ मध्ये होणाऱ्या पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ओपन कॅटेगिरी फोरम आपली स्वतंत्र्य भूमिका मांडणार असल्याचे फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रपरिषदेला मुन्ना राठोड, गोपाल तिवारी, विक्रमादित्य शुक्ला, सतीश उपाध्याय, विक्रम चांडक, अमर चौबे, जुगल ओझा, रूपेश शास्त्री उपस्थित होते. (प्रतिनिधी)
२६ टक्के आरक्षणासाठी ओपन कॅटेगिरी फोरमचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:12 IST