शेंदूरजनाघाट परिसरात उत्पादक चिंताग्रस्त :
जयप्रकाश भोंडेकर
शेंदूरजनाघाट : शेंदुरजनाघाट परिसरातील संत्रा झाडावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. या अज्ञात रोगामुळे संत्रा झाडांवर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात निघालेली नवती पिवळी पडून वाळत आहे. हा प्रकार कशामुळे होत आहे, हे संत्राउपादकांना कळेनासे झाले आहे. विविध फवारणी, चुना, मोरचूदचे डिन्चिंग शेतकरी करीत आहेत. तरीसुद्धा तो अज्ञात रोग आवाक्यात येत नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत.
गतवर्षी आंबिया बहराच्या फळांना भाव मिळाला नव्हता. कवडीमोल भावात संत्रा विकावा लागला. यावर्षीदेखील अंबिया बहार फुलेल, या आशेवर उत्पादक असताना पुन्हा निराशाच हाती आली. अनेक संत्राझाडांवर अंबिया बहर फुलला नाही. उलट संत्राझाडांवर मोठ्या प्रमाणात पानगळ सुरू झाली. यामुळे संत्राझाडांच्या फांद्यांचा खराटा झाला. नवतीमुळे झाडे भरतील, अशी आशा शेतकऱ्यांना असताना, आता मात्र या अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
२५ टक्के फुलला बहर
२०२० मध्ये अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या फळांवर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून शेतकऱ्यांनी त्यांची निगा राखली. मात्र, आता भाव मिळत नसल्याने मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शेंदूरजनाघाट परिसरात शेतकऱ्यांचा वर्षभराचा व्यवहार संत्र्यावर अवलंबून आहे. केवळ २५ टक्के अंबिया फुलला, असे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी विभागाने कोळसी, शंकुरोग, डिंक्या रोग व आता नव्याने आलेल्या अज्ञात रोगावर योग्य मागदर्शन करावे व शासनाने फवारणीकरिता मोफत औषध पुरवठा करावा, अशी मागणी परिसरात शेतकरी करीत आहेत.
---------------
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
कोळशीबरोबरच झाडावर बारीक शंकू असल्याने फांदया वाळत चालल्या आहेत. पाणी दिल्यावर शेंडेवाढ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकीकडे अंबियाची फूट झाली नाही. दुसरीकडे झाडांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
--------------
या भागात आढळला प्रादुर्भाव
सातनूर, पुसला, वाई, धनोडी, मालखेड, झटामझिरी, वरूड, जरूड, लोणी, चांदस वाठोडा, सुरळी कुरळी, तिवसाघाट, बेनोडा, हिवरखेड, पुसली या परिसरात शेतकरी अंबिया बहर मोठ्या प्रमाणात घेतात. येथेच संत्राबागांमध्ये अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
कोट
अतिपावसामुळे संत्राझाडांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करावे. उपाययोजना सुचवाव्यात. फवारणीकरिता मोफत औषध पुरवठा करावा.
- अभय अनासाने, संत्रा उत्पादन, सातनूर
पान २ ची लिड