- गणेश वासनिक अमरावती - पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यासक्रम तयार करताना जे उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम बनवता कामा नये, तर त्यांच्यात कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोनही आणला पाहिजे. तरच वाढलेल्या सामाजिक आनंदाने राष्ट्राचा विकास साधता येईल, असे गौरवोद्वगार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी येथे केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सर्वेाच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई होते. यावेळी मंचावर राज्यपालांचे सचिव आयएएस प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांनी स्थानिक औद्योगिक मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. अमरावती विभागाच्या शाश्वत विकासासाठी स्थानिक संसाधने आणि प्रतिभांचा सर्वोत्तम वापर करावा. विद्यापीठांनी नवीन ज्ञान तयार करावे. केवळ मजबूत संशोधन आधारित परिसंस्थेद्वारेच केले जाऊ शकते. त्याकरिता शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठांनी धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नमुना तयार करावा. तसेच वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका तयार करून त्याचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या हितांना प्राधान्य देण्याचे काम करावे, असे राज्यपाल म्हणाले. पदवीधर विद्यार्थ्यांनी परदेशी भाषा शिकावीपरदेशी विद्यापीठांशी भागीदारी करून विद्यार्थ्यांसाठी बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक देशांना भारतातील विविध क्षेत्रांतील कुशल व्यावसायिकांची गरज आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी कोणतीही परदेशी भाषा शिकून त्यात करिअर करावे. विद्यार्थ्यांना परदेशी भाषा संवाद कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी विद्यापीठात त्यांचे परदेशी भाषा कार्यक्रम सुरू करून मजबूत करण्यास प्रोत्साहित करावे, असे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.