अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सुट्या भागांची चोरी संदीप मानकर अमरावतीप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध कारवाईत जप्त केलेल्या ५८ आॅटोरिक्षांचे संपूर्ण स्पेअर पार्ट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. सविस्तर असे की, रोड टॅक्स न भरणे, कागदपत्रे योग्य नसणे, आॅटोचा परवाना व नोंदणीकृत नसणे यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सह. मोटार वाहन निरीक्षकांनी दीड वर्षांत ५८ विविध आॅटो चालकांविरुद्ध कारवाई केली व आॅटो जप्त करून ते प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात लावले. जेव्हा ते आॅटो जप्त करण्यात आले तेव्हा ते चांगल्या स्थितीत असल्याचे कळते. परंतु दीड वर्षांनंतर त्या आॅटोचे सांगाडेच शिल्लक राहिल्याचे निदर्शनास आले. त्या आॅटोतील संपूर्ण स्पेअर पार्ट, इंजिन व टायर व इतर साहित्य गायब झाले आहे. परंतु याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. नेमके आॅटोतील साहित्य आॅटोच्या मूळ मालकांनी नेले बाहेरील चोरांनी नेले की, आरटीओ कर्मचाऱ्यांनी सफाया केला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक आॅटोंना मूळ मालकच नसल्याचे बोलले जात आहे. काही आॅटो भंगार झाले आहेत. परिवहन कार्यालयात जर जप्त केलेले आॅटो लावण्यात आले तर ते चोरीला जाऊ नये याची जबाबदारी आरटीओ कार्यालयाची आहे. त्यामुळे आॅटोचे सांगाडे झालेच कसे, असा प्रश्न पडला आहे. अनेक आॅटो चालकांनी आॅटो सोडवून नेले नाही. त्यांना आरटीओच्यावतीने दोन ते तीन वेळा नोटीसा बजावण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांनी सांगितले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भाची तक्रार पोलिसात करून जप्त केलेल्या आॅटोतील पार्ट चोरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ५८ आॅटोंचे झाले सांगाडेआमच्या प्रतिनिधीने आरटीओ कार्यालयात फेरफटका मारला असता परिसरात जप्त केलेल्या ५८ आॅटोंचे संपूर्ण स्पेअर पार्ट गायब झाल्याचे निदर्शनास आले. चोरांनी हे पार्ट चोरुन नेले असून केवळ त्यांचे सांगाडे तितके शिल्लक राहिले आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून हा प्रकार राजरोसपणे घडला आहे.
आरटीओने जप्त केलेल्या आॅटोंचे उरले केवळ सांगाडे
By admin | Updated: October 25, 2015 00:15 IST