अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी सोमवार, १५ मार्चपर्यंत म्हणजेच अर्ज प्रक्रियेच्या १० दिवसांत ३,५२८ पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाईन प्रवेश अर्ज केले आहेत.
जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता २४४ शाळांनी नोंदणी केलेली आहे. या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेकरिता २५ टक्क्यांनुसार २,०७६ जागा आहेत. या जागांवर प्रवेशाकरिता प्रवेशपात्र असलेल्या पाल्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली. २१ मार्चपर्यंत प्रवेशासाठी पालकांना अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती लक्षात घेता पालकांनकडून प्रवेशासाठीची जागांपेक्षा अर्जाची संख्या वाढली आहे. येत्या आठवडाभर अर्ज करण्यासाठी अवधी असल्यामुळे या अर्जसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरटीईकरिता यावर्षी जिल्ह्यात सर्वात जास्त अर्ज शहरातून दाखल केले जात आहेत. त्या पाठोपाठ इतर ग्रामीण भागातून दाखल झाले आहेत.
बॉक्स
२४४ शाळा २,०७६ जागा
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात यंदा २४४ शाळांनी नोंदणी केलेली आहे. या शाळांमध्ये या वर्षासाठी २,०७६ रिक्त जागा आहेत. या जागांकरिता पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे यंदा अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून पालकांचा अर्ज भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.