पान २ ची बॉटम
सरासरी पावसामुळे विहिरींना पाणी : पहूर, वेणी गणेशपूर शिवारात पेरणी
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात उन्हाळ्यातील कांदा व लसूण पीक काढण्याची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात १२३ हेक्टर कांद्याची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी आता कांदा व लसूण पीक काढणे सुरू केले आहे.
तालुक्यात यावर्षी ९८४ मिमी पाऊस पडल्याने शेतीतील विहिरीला सिंचनासाठी पाणी होते. त्याच्या बळावर रबी हंगामात ६ हजार २०० हेक्टर क्षेत्रात गहू व ८ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाचा पेरा झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, कांदा, लसूण पिकांचीही यावर्षी लागवड केली.
लसूण पीक हे पाच महिन्यांचे असून, ऑक्टोबर महिन्यात या पिकाची लागवड करण्यात आली मार्चअखेर लसूण पीक काढण्याचे काम सुरू झाले आहे. पहूर, वेणी गणेशपूर, जावरा, रोहना, मोखड, शिवनी, गौरखेडा, कोव्हळा जटेश्वर, धानोरा गुरव परिसरात लसूण पिकाची यावर्षी शेतकऱ्यांनी लागवड केली.
पिकाच्या लागवडीसाठी एकरी साडेतीन क्विंटल लसूण कळीचे बेणे लागते. या पिकास कीटकनाशक व बुरशीनाशकची पाच ते सहा वेळा फवारणी करावी लागते. लागवड, निंदण व काढणीचा सुमारे एकरी १५ हजार रुपयांचा खर्च होतो तसेच तीन वेळा रासायनिक खते व एकरी चार ट्रॅक्टर शेणखत द्यावे लागते. अशाप्रकारे ८० हजार रुपये एकरी खर्च या पिकासाठी होतो. एकरी ५० ते १०० क्विंटल पिकाचे उत्पादन अपेक्षित असते. जैविक पद्धतीचा वापर केल्यास पिकाचे हमखास उत्पादन मिळते, असे पहूरचे शेतकरी अजय बेले यांनी सांगितले.
असे काढा उत्पादन
सपाट मैदानी भागात लसणासाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध असते. त्यामुळे ९० टक्के लागवड ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. तापमानास संवेदनशील असे पीक असल्याने भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करणे योग्य आहे. हे पीक थंड हवेस प्रतिसाद देते. पण, गडुा पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानांची वाढ होते व त्यांची संख्या वाढते. हा काळ साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेंटिग्रेड दरम्यान लागते.
११ ते १२ तास सूर्यप्रकाश आवश्यक
हवेत ७० ते ८० टके आर्द्रता व ११ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गडुा आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आर्द्रता कमी व तापमान वाढलेले पाहिजे. त्यामुळे पात वाळणे, गडुा सुकणे या क्रिया सुलभ होतात. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. उशिरा लागवड झाली, तर गड्यांचा आकार कमी होतो. वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. थंड व पहाडी क्षेत्रात लावल्या जाणाऱ्या जाती वेगळ्या असतात. या जातीमध्ये १० ते १२ पाकळ्या असतात. परंतु, प्रत्येक पाकळ्याचे वजन चार ते पाच ग्रॅम असल्यामुळे गडुा आकाराने मोठा असतो. या जाती महाराष्ट्रातील हवामानात येत नाहीत. केवळ पाने वाढतात व पाकळ्या तयार होत नाहीत.