डेडलाईन : खुलासा सादर करण्याची आज शेवटची मुदतअमरावती : धामणगांव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील विद्यालयाची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. सामाजिक न्याय विभागाने शाळेला बजावलेल्या नोटीशीचे उत्तर बुधवारपर्यंत प्राप्त न झाल्यास एकतर्फी कारवाई केली जाईल, अशी माहिती आहे.आश्रमात घडलेल्या नरबळी हल्लाप्रकरणी ‘लोकमत’ने शोधपत्रकारितेद्वारे तत्थ्यांची मालिकाच लोकदरबारात सादर केली. सामाजिक न्यायविभागाने या शोधवृत्तमालेची गंभीर दखल घेतली. याप्रकरणाची सखोल चौकशी केली. प्रधान सचिव अमरावतीत धडकले. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने सुरू झालेल्या कारवाईदरम्यान विद्यालय व्यवस्थापनाकडून शासनाला अद्यापही खुलासा प्राप्त झाला नाही. खुलासा देण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने सांयकाळी पाच वाजेपर्यंत खुलासा सादर न केल्यास आश्रमातील शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी जिल्हा सहायक समाज कल्याण आयुक्त यांच्यामार्फत तसा प्रस्ताव समाज कल्याण आयुक्तांना पाठविला जाणार आहे. (प्रतिनिधी)
-तर शाळा रद्द करण्याची एकतर्फी कारवाई
By admin | Updated: August 30, 2016 23:57 IST