(फोटो आहे)
आरोपीला न्यायालयीन कोठडी, १३ कासव विक्रीचे प्रकरण, अमरावती वनविभागाची कारवाई
अमरावती : कासव तस्करीप्रकरणी भोपाळ येथून एका आरोपीस वनविभागाने अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर आराेपीला कोठडी सुनावण्यात आली आहे. हुजेफा अब्देअली बोहरा (२६, रा. भोपाळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कासव तस्करीप्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही हाती लागला नाही, अशी माहिती आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, २५ जुलै २०२० रोजी घरी कासव बाळगल्याप्रकरणी निशांत जयस्वाल (२६) व सार्थक भांडे (२६, रा. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीअंती या दोघांनीही तब्बल १३ कासव हे भोपाळ येथून खरेदी केल्याचे बयाणात सांगितले. एवढेच नव्हे तर कासव खरेदी केल्याची रक्कम ही पेटीएमद्वारे संबंधितांना पाठविण्यात आल्याची कबुली या दोघांनीही दिली होती. त्यानुसार वनविभागाने या कासव तस्करी प्रकरणाचा मागोवा घेतला. कासव तस्करीचे जाळे शोधण्यासाठी वनविभागाची चमू भोपाळ येथे जाऊन आली. भोपाळ पोलिसांनी कासव विक्रीप्रकरणी आरोपी कारागृहात असल्याची माहिती वनविभागाला दिली. या एकूणच घडामोडींची माहिती वन विभागाच्या तपास चमूकडून उपवनसंरक्षक चंद्रशेखरन् बाला यांना देण्यात आली. भोपाळ कारागृहात असलेल्या आरोपीला ताब्यात
घेण्यासाठी प्रोडक्शन वाॅरंट तयार करण्यात आला. त्यानंतर भोपाळ कारागृहात हुजेफा अब्देअली बोहरा (२६) याला २४ डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव अधिनियम ४८ अ, ४८ ब, ९/३८ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला. येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीस हजर केले असता, त्याला ९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे प्रमुख प्रशांत भुजाडे, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, वनापाल राजेंद्र घागरे, सुमीत भुयार, सी.एस. मानकर आदींनी केली आहे.
-------------------------
घरी कासव बाळगू नका
कासव हा प्राणी वन्यजीव अधिनियम अंतर्गत भाग २ मध्ये गणला जातो. कासव घरी ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते वा संकट दूर होते, असा अनेकांमध्ये गैरसमज आहे. त्यामुळे कासव घरी ठेवतात. मात्र, यापुढे कासव आढळल्यास संंबंधितांवर वन्यजीव अधिनियमानुसार कारवाई होईल. यात तात्काळ जामीनदेखील
मिळत नाही. अंधश्रद्धेपोटी कोणीही घरी किंवा प्रतिष्ठानांमध्ये कासव ठेवू नये, असे आवाहन उपवनसंरक्षक चंद्रशेखरन् बाला, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी केले आहे.