अमरावती : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती उपायुक्त सुनील वारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राखीव जागांवर उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
निवडणूकविषयक प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात उसळल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला. त्यामुळे अनेकांचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर होऊ शकले नाही. मात्र, ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज स्वीकारण्यास ‘बार्टी’ने परवानगी दिली आहे. समाजकल्याणच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑफलाईन प्रणालीने अर्ज देता येणार आहेत. ३० डिसेंबर राेजी ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील, असे वारे यांनी स्पष्ट केले आहे. अर्जदारांच्या ऑफलाईन अर्जाची माहिती बार्टीकडे पाठवावी लागेल, असे पत्राद्वारे कळविले आहे.
००००००००००००००
व्हॅलिडीटी’साठी तीन दिवसांत २१३ अर्ज
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २५ ते २७ डिसेंबर दरम्यान शासकीय सुट्यांच्या दिवशी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरू ठेवले. या तीन दिवसांत एकूण २१३ उमेदवारांनी ‘व्हॅलिडीटी’साठी अर्ज सादर केले. ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी १२ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीस प्रारंभ झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक उमेदवारांनी ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी अर्ज सादर केले आहेत.