महापालिका आयुक्तांचा निर्णय : कोणतेही शुल्क, परवानगीची गरज नाहीअमरावती : संत्रा उद्योग वाढीस लागावा तसेच जनतेपर्यंत संत्रा सहजतेने पोहचावा, यासाठी महापालिकेने शहरात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल लावण्याची मुभा दिली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संत्रा विक्रीचे स्टॉल लावताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, ही काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले आहे.यावर्षी संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु विदेशात संत्र्याला फारशी मागणी नसल्याने विशेषत: विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. झाडावरच संत्री उभी तर बाजारपेठेत भाव नाही या विवंचनेत संत्रा उत्पादक आहेत. यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे संत्रा उत्पादकांच्या मदतीला धावून आलेत. स्टॉल लावण्यास परवानगीची आवश्यकता नाहीअमरावती : संत्रा उत्पादकांनी थेट संत्र्या विक्री केल्यास दलालांची मध्यस्ती अथवा कोणालाही पैसे देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे महापालिकेने शहरात संत्रा विक्रीचे स्टॉल लावायचे असल्यास कोणतीही परवनागी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र संत्रा उत्पादकांनी स्टॉल लावताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त गुडेवार यांनी केले आहे. स्टॉल लावताना संत्रा विक्री ही स्वत: उत्पादक शेतकऱ्यांनी करणे अनिवार्य आहे. स्टॉल लावताना कटला, हातगाडीवरच संत्रा विक्री करावी. कोणाच्याही भूखंडावर वहिवाटीचे हक्क बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे स्थायी, अस्थायी बांधकाम करु नये तसेच चौकात स्टॉल लावून संत्रा विक्री करू नये, असे आदेश काढले आहे. (प्रतिनिधी)
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल लावून विक्रीची मुभा
By admin | Updated: December 24, 2015 00:15 IST