अमरावती : महापालिका नियंत्रणात सुरू असलेल्या ‘आपली परिवहन’ शहर बसमधून गरजू, गरीब विद्यार्थ्यांना मोफत बस पास देऊन त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रवादी फ्रंटचे सदस्य तथा झोन सभापती मिलिंद बांबल यांनी सर्वसाधारण सभेत आणला आहे. या प्रस्तावाने सामान्य कुंटुंबातील विद्यार्थ्यांना ये- जा करणे सुकर होईल.अमरावती शहरात १०२ घोषीत झोपडपट्ट्या असून इतरही स्लम भाग मोठ्या संख्येने आहे. परंतु शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी ये- जा करण्याचीे आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक कुंटुंबातील विद्यार्थी नामांकित शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही. या विद्यार्थ्यांच्या अंगी कौशल्य, गुण असताना घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे ते जवळील शाळा, महाविद्यालात प्रवेश घेतात. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना बसेसची पास देण्याची सोय महापालिका प्रशासनाने केल्यास हे विद्यार्थी नक्कीच नामांकित शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत मोठी झेप घेतील, यात दुमत नाही. महापालिका प्रशासनाने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ई- लर्निंग प्रणाली सुरु करुन गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या प्रयत्नाने आज शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे गिरविता येत आहे. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत बस पासेस दिल्यास त्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाने मोठे सहकार्य करण्यासारखे होईल, असे मिलिंद बांबल यांचे म्हणने आहे. महापालिका नागरिकांच्या मुलभूत सोईसुविधांची पुर्तता करीत असताना गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शहर बसेची पास देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे बांबल यांचे मत आहे. त्याअनुषंगाने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव क्र. १४० अन्वये हा विषय सदस्यांच्या पुढ्यात आणला गेला आहे. या प्रस्तावाला अविनाश मार्डीकर, चेतन पवार, हमीद शद्दा, मो. इमरान, भूषण बनसोड, अजय गोंडाणे, नीलिमा काळे, जयश्री मोरे, ममता आवारे, सारिका महल्ले यांचे अनुमोदन आहे. (प्रतिनिधी)
गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत बससेवेचा प्रस्ताव
By admin | Updated: August 17, 2015 00:05 IST