(फोटो घेणे)
अमरावती : सिनेट सभा ऑफलाईन घेण्यात यावी, अशी मागणी होती. एवढेच नव्हे तर पत्रपरिषदेद्वारे यासंदर्भात प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. मात्र, विद्यार्थी, शैक्षणिक हिताबाबत कुलगुरूना काहीही घेणे-देणे नाही. विद्यापीठाच्या या अफलातून कारभाराविषयी राज्यपालांना निवेदन पाठविले. तरीदेखील कुलगुरूंच्या कारभारात कोणताही बदल झाला नाही. त्याच्या निषेधार्थ मंग़ळवारी आयोजित ऑनलाईन सिनेट सभेवर ‘नुटा’ सदस्यांनी बहिष्कार नोंदवित कुलगुरूंना निवेदन सादर केले.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार, विद्यार्थी, शिक्षण, अभ्यासक्रम, संशोधन,
विविध स्पर्धात्मक पातळीवर विद्यापीठाचा दर्जा खालावला आहे. अपात्र व्यक्तींची प्राधिकरणांवर नियुक्ती, शासनादेश दडवून ठेवणे या आधारावर सिनेट सभेत उपस्थित केलेले प्रश्न नाकारणे अशा मुद्द्यावरही लक्ष वेधण्यात आले. उन्हाळी २०२० परीक्षेत उडालेला गोंधळ, निकाल रोखणे, विद्यार्थ्यांची तारांबळ, ऑनलाईन परीक्षेचा बोजवारा अशा विविध प्रश्नावर ‘नुटा’चे सिनेट, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी बोट ठेवले. सदस्यांचे नियमानुसार असलेले प्रश्न नाकारणे ही बाब लोकशाहीला मारक असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी प्रवीण रघुवंशी, विवेक देशमुख, बी.आर. वाघमारे, प्रदीप देशपांडे, गजानन
कडू, वसंत घुईखेडकर, परमानंद अग्रवाल, व्ही.एम. मेटकर, सुभाष गावंडे, किरण परतेकी, दिलीप कडू, आर.ए. उमेकर, रवींद्र मुंद्रे, संतोष ठाकरे, नीलेश गावंडे, रमेश सरपाने, विजय कापसे, अर्चना बोबडे आदींनी कुलगुरूंना निवेदन सादर करून ऑनलाईन सिनेट सभेवर बहिष्कार नोंदविला.
---------------------
- तर कुलगुरूंचे कारनामे बाहेर काढू : संतोष ठाकरे
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी काही वृत्तपत्रांना मुलाखत देत, आम्ही प्रसिद्धीसाठी पत्रपरिषद घेतली, असा आरोप केला. विद्यार्थिहितासाठी ऑफलाईन सभा घेण्याविषयी मागणी होती. कुलगुरूंचे हे बेताल व्यक्तव्य योग्य नाही, अन्यथा आम्ही देखील त्यांचे शैक्षणिक, संशोधन, जात प्रमाणपत्र आदी मुद्द्यांवर कुलगुरुपदासाठीच्या अपात्रतेचा मुद्दा समाजासमोर आणू, असा इशारा सिनेट सदस्य तथा प्राचार्य संतोष ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. कुलगुरू चांदेकर हे नागपूर विद्यापीठात अपात्र ठरतात, मग अमरावतीत पात्र कसे ठरले, ही बाब संशोधनास पात्र असल्याचे ठाकरे म्हणाले. कुलगुरूंनी आमच्याबद्दल बेताल व्यक्तव्य टाळावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.