अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा नियम शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यावर कार्यालयात १०० टक्के उपस्थितीचा आदेश १५ जून रोजी जारी केला. त्यानुसार शुक्रवारपासून जिल्हा परिषदेतील अभ्यागतांची वर्दळ पुन्हा वाढली आहे. मात्र सभा, बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले होते. त्यामुळे शासकीय कार्यालयातील उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केला होता. यामधून आरोग्य व पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भात गुरुवारी आदेश जाहीर केला आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली कार्यालयातील कर्मचाऱ्यांना १६ जूनपासून कार्यालय १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपासून जिल्हा परिषदेची वर्दळ कोरोनामुळे ओसरली होती. मात्र आता जिल्हा परिषदेतील उपस्थितीवरही असलेल्या मर्यादा हटविण्यात आल्यामुळे साहजिकच कामानिमित्त येणाऱ्या जिल्हा परिषदेतील अभ्यागतांची गर्दी वाढत असल्याचे चित्र शुक्रवारी मिनी मंत्रलायात दिसून आले.
बॉक्स
उपस्थितीचे निरीक्षण
कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर कडक निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार झेडपीच्या अखत्यारितील विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यात सीईओंनी आदेश १५ जून रोजीच जारी केले होते. त्यानुसार शुक्रवार, १६ जून रोजी या आदेशानुसार कार्यालयात उपस्थिती आहे का? याची पडताळणी सीईओंच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. यात अनेक विभागात उपस्थिती कमी असल्याचे तपासणी चमूला दिसून आले.
कोट
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी ऑनलाईन कामाला प्राधान्य दिले जाईल.
- अविश्यांत पंडा,
मुख्य कार्यकारी अधिकारी