इर्विनचा आढावा : शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांचे निर्देशअमरावती : रुग्णांना गरजेनुसार आॅनकॉल आरोग्य सेवा पुरवावी, असे निर्देश स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलबंन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. त्यांनी मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावा घेतला. तिवारी यांनी तत्पूर्वी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक एस.एच. निकम उपस्थित होते. तिवारी यांनी सुपर स्पेशालिटीची आढावा घेत रुग्णालयीन व्यवस्थापनावर लक्ष वेधून तेथील बांधकामाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ते निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे मोर्चा वळवीत रुग्णालयाची पाहणी केली. वॉर्डात जाऊन रुग्णांकडून आरोग्य सेवेबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. तेथे जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, आरएमओ अशोक वणकर व अधिसेविका मंदा गाढवे यांना सोबत घेऊन बाह्यरुग्ण कक्षाची पाहणी केली. पूुर्वीपेक्षा रुग्णालयात अनेक सुधारणा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सिकलसेल, एनआरएचएम, मनोरुग्ण विभाग व वॉर्ड क्रमांक ५ ची पाहणी केली. वॉर्ड क्रमांक ५ मधील रुग्णांना विचारपूस करुन आरोग्य सेवा सुरळीत पुरविल्या जाते किंवा नाही. यांची शहानिशा केली. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ ऋषिकेश नागलकर यांना योग्य ते निर्देशसुध्दा दिले. यावेळी पत्रकांराशी संवाद साधताना ते म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरु आहेत. राजीव गांधी योजना रुग्णांसाठी सुलभ व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. शासकीय रुग्णालये 'अपगे्रड' करणे हा एक मिशनचा भाग आहे. त्यातच रुग्णांना योग्य आरोग्य मिळावी, या उद्देशाने डॉक्टरांची ड्युटीवर फोकस करण्यात येत आहे. डॉक्टरांना पूर्णवेळ वॉर्डात उपस्थित राहून आरोग्य सेवा पुरवावी लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये सुसज्ज करण्यात आले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ताराबंळ उडाली होती. (प्रतिनिधी)
आता वैद्यकीय सेवा आॅनकॉल पुरवावी लागणार
By admin | Updated: September 30, 2015 00:39 IST