‘महावितरण’चा निर्णय : ग्रामीण भाग उजळणार, शेतकऱ्यांनाही मिळेल दिलासालोकमत विशेषजितेंद्र दखने अमरावतीट्रान्स्फार्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर दुरूस्तीसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी महावितरणमध्ये प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफॉर्मर भवन उभारण्यात येणार आहे. याठिकाणी दुरूस्तीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची कायमस्वरुपी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे आता गावे उजळणार आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज्यातील वीज पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. त्यादरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी विलंब होत असल्याचे या दौऱ्या दरम्यान निदर्शनास आले. दुरूस्तीची व्यवस्था नसल्याने राज्यभर ही स्थिती आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. या ुपार्श्वभूमिवर प्रत्येक तालुक्यात एक ट्रान्सफार्मर भवन उभारण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. यानुसार विभागीय कार्यालयांतर्गत प्रत्येक तालुक्यात ट्रान्स्फार्मर भवन सुरू केले जाईल. त्यामध्ये अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर भवन म्हणजे एक ५५ बाय ५५ फुटांचे शेड असणार आहे. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या मोठ्या आणि किरकोळ दुरुस्तींसाठी लागणारी यंत्रसामुग्री कायमस्वरुपी ठेवली जाणार आहे. ट्रान्सफार्मर भवन उभारून त्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे परिमंडळनिहाय प्रस्ताव पाठविण्याचे आदेश महावितरणच्या मुख्यालयाकडून सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. अमरावतीसह राज्यभरात १० विभागीय कार्यालये आहेत. यासर्व विभागीय कार्यालयक्षेत्रात ट्रान्सफॉर्मर भवन साकारले जाणार आहे. महावितरणचा हा अत्यंत उपयोगी उपक्रम मानला जात आहे. (प्रतिनिधी)दुरुस्तीचा वेळ वाचणारसध्या ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास त्या भागातील वीज पुरवठा खंडीत होतो. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दुरूस्तीसाठी लागणारी यंत्रणा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नसल्याने त्याची व्यवस्था होईपर्यंत त्या परिसरातील वीज पुरवठा बंद असतो. ही गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफार्मर भवन बांधले जाणार आहेत.वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत माहिती मागितली आहे. त्यानुसार चौदाही तालुक्यातून अहवाल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.- दिलीप घुगल,अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, अमरावती.
आता तालुकानिहाय ट्रान्सफॉर्मर भवन
By admin | Updated: November 17, 2015 00:15 IST