अल्पदरात मिळणार सुविधा : गोरगरिबांनाही मिळू शकेल रेडिओलॉजीचा फायदाअमरावती : अनेक रुग्ण असाध्य रोगाने पीडित असतात. त्या रुग्णांच्या आजाराचे वेळीच निदान होत नाही. खासगी रुग्णालयातील उपचार त्यांच्या आवाक्याबाहेर असतात. अशा विपरित स्थितीत त्यांना मानसिक व आर्थिक तणाव सोसावा लागतो. त्यामुळे त्यांना अल्पदरात आरोग्य सेवा देण्यासाठी विदर्भातील विविध जिल्हा रुग्णालयात व स्त्री रुग्णालयांमध्ये किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने आरोग्य विभागाद्वारे भागिदारी तत्वावर उच्च गुणवत्तेच्या व सर्वसामान्यांना परवडण्या योग्य चिकित्सा सेवा देण्यासाठी ३५ जिल्हा सामान्य रुग्णालये व स्त्री रुग्णालयांची निवड केली आहे. यामध्ये २४ जिल्हा सामान्य रुग्णालये, ६ महिला रुग्णालये, ४ सामान्य रुग्णालये व एका केंद्रीय रुग्णालयाचा समावेश आहे. या किरणोपयोजन केंद्रातून क्ष-किरण, युएसजी, मॅमोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय या सुविधा अल्पदरात पुरविले जाणार आहेत. या आरोग्यसेवांसाठी खासगी रुग्णालये किंवा रेडिओलॉजी लेबॉरेटरीमधून मोठा खर्च आकारला जातो. त्यामुळे सरकारी रुग्णालयातून उपचार घेण्याशिवाय कुठलाही पर्याय गोरगरीब रुग्णांसमोर उरत नाही. शासकीय जिल्हा रुग्णालये शहरातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यामुळेच वरदान ठरतात. ही रुग्णालये सुसज्ज व्हावीत म्हणून शासकीय रुग्णालयांच्या आसपासच्या जागेतही केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रावर विशेष प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी वर्गाकडून रुग्णांना सेवा पुरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
आता जिल्हा रुग्णालयांमध्ये किरणोपयोजन चिकित्सा
By admin | Updated: October 27, 2014 22:28 IST