अमरावती : सणासुदीच्या दिवसांत दुग्धजन्य पदार्थांत होणारी भेसळ लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने आता मोबाईल व्हॅनद्वारे आॅन द स्पॉट दुधाची तपासणी प्रक्रिया सुरु केली आहे. गुरुवारी शहरात दाखल झालेल्या दोन टँकरमधील दुधाचे नमुने मोबाईल व्हॅनमधील कीटद्वारे तपासण्यात आले असून पुढील तपासणीकरिता दुधाचे सहा नमुने विभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डाने मोबाईल व्हॅनमधील कीट तयार केली असून अमरावती येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाला एक मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. त्या कीटद्वारे दुधातील भेसळ पाहण्याचा प्राथमिक अंदाज काढला जाऊ शकणार आहे. प्राथमिक तपासणीमध्ये दुधात साखर, ग्लुकोज, सोडा व युरिया अशा काही पदार्थांचे ेभेसळ होत आहे का याचा शोध त्या कीटद्वारे घेण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे विभागीय सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या नेतृत्वात सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी जंयत वाणे, फरीद सिद्धिकी, राजेश यादव, अमित उपलत, पदुराज दहातोंडे, धनश्याम दंदे यांच्या पथकाने मोबाईल व्हॅनद्वारे गुरुवारी पहाटे ४ वाजतापासून औद्योगिक वसाहत परिसरात ठिय्या मांडला होता. त्या मार्गावरील दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकरवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. तब्बल दोन तास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गावरील दुधाची वाहतूक करणाऱ्या टँकरवर लक्ष ठेवले. दरम्यान सकाळी ६ वाजताच्या सुमारास मोबाईल व्हॅनमधील कीटच्या माध्यमातून त्या मार्गाहून जाणाऱ्या एका टँकरमधील दुधाची तपासणी करण्यात आली. त्या टँकरमधील ३ दुधाचे नमुने पुढील तपासणीकरिता विभागीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राजकमल चौकामध्ये एका दुधाच्या टँकरचे ३ नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे आता दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येत असल्याने शहरातील दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीचा प्राथमिक अंदाज काढणे आता सहज शक्य होणार आहे.
आता आॅन द स्पॉट भेसळयुक्त दुधाची तपासणी
By admin | Updated: September 20, 2014 23:42 IST