प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : पटसंख्या, शाळाबाह्य मुलांची घेणार माहिती अमरावती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकली आहे. शैक्षणिक गुणवत्तेची निकोप स्पर्धा सुरु झाली. त्यामुळे प्रगत शाळा शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. परिणामी आता ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत सर्वच शाळांना १८० गुणांची परीक्षा द्यावी लागेल. या संदर्भातील पत्र व प्रगत शाळांचे निकष राज्याचे शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी शाळांना पाठविले आहेत. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ धोरणानंतर राज्यातील ११ हजार २२८ शाळा डिजिटल झाल्या आहेत. तर राज्यातील १२ हजार ९०४ शाळांनी ‘अॅक्टीव्हीटी बेस’ मध्ये सहभाग नोंदविला.४९ कोटी ३८ लाखांचा निधी लोकसहभागातून जमा झाला. राज्यात १ हजार ३६८ शाळा ‘आयएसओ’ मानांकित झाल्या. फेब्रुवारी महिन्यात ८ हजार २५१ शाळा प्रगत झाल्याचा अहवाल शिक्षण विभागाने दिला आहे. आता या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांंतर्गत सर्वच शाळांना १०० गुणांची परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये ज्या शाळांना १०० टक्के गुण मिळतील तीच शाळा प्रगत ठरेल. राज्यातील पहली ते आठवीपर्यंतच्या मराठी, उर्दू,इंग्रजी या तिन्ही माध्यमांच्या शाळांना ही सर्व माहिती भरावी लागणार आहे. १०० गुणांच्या या परीक्षेत पटसंख्या, शाळाबाह्य मुले, शाळा परिसर, ज्ञानरचनावादी साहित्य, प्रगत व अप्रगत विद्यार्थी, शैक्षणिक साहित्य वर्गानुसार आकलन व मांडणी या विषयांवर प्रश्न विचारले जातील. परीक्षेनंतर अन्य जिल्ह्यातील शिक्षकांकडून तपासणी होईल आणि तपासणीनंतरचा अहवाल त्याच दिवशी शासनाकडे आॅनलाईन पाठविला जाईल. शालेय शिक्षण विभागाने १०० गुणांच्या परीक्षेसह प्रत्येक जिल्ह्यात २०० शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट त्या-त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. उद्दिष्टपूर्तीनंतर आधारित नोंदी गोपनीय अभिलेखात घेण्यात येतील, असे भापकरांच्या आदेशात नमूद आहेआॅनलाईन राहणार परीक्षा जिल्ह्यातील १४ ही तालुक्यात केंद्र प्रमुखांमार्फत सर्वच शाळांना हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. १०० गुणांची परीक्षा आॅनलाईन द्यावी लागणार असल्याची माहिती त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी दिली. निकोप शैक्षणिक स्पर्धेसाठी परीक्षा महत्त्वाची प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणामधील ही स्पर्धा शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील निकोप स्पर्धेसाठी महत्त्वाची आहे. केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी कायद्याची चौकट असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्याकारिणी सदस्य राजेश सावरकर यांनी सांगितले. असे आहे परीक्षेचे स्वरुप१०० गुणांच्या या परीक्षेत पटसंख्या, शाळाबाह्य मुले, शाळा परिसर, ज्ञानरचनावादी साहित्य, प्रगत-अप्रगत विद्यार्थी, शैक्षणिक साहित्य, वर्गानुसार आकलन व मांडणी हे निकष असतील. ही आॅनलाईन परीक्षा असून परीक्षेची अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांकडून तपासणी केली जाणार आहे.
आता शाळांची १०० गुणांची तपासणी
By admin | Updated: April 6, 2016 00:02 IST