शेकडो गुन्हे दाखल : २१ बनावट चाव्या, पेचकस, ४६ घड्याळी जप्त अमरावती : नऊ वर्षांपासून फरार असणाऱ्या कुख्यात चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास मसानगंज परिसरातून जेरबंद केले. गणेश ऊर्फ मुन्ना रामदिन साहू (४८,रा. मसानगंज ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून घरफोडीतील पेचकच व २१ बनावट चाब्यासह ४६ घड्याळीसुध्दा जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपीवर जिल्ह्यासह विविध शहरात शेकडो गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. मसानगंज परिसरातील रहिवासी गणेश साहू हा चोरी करण्याच्या उद्देशाने नाव बदलून विविध परिसरात राहत होता. त्याने २००६ पासून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेकडो घरफोड्या केल्या आहेत. मंगल कार्यालये व लॉज हे गणेशचे मुख्य टारगेट असल्यामुळे तो तेथे जाऊन नागरिकांचे दागिने व साहित्य चोरी करीत होता. वर्धा, अकोला व अमरावती शहरातील कोतवाली, नांदगाव पेठ, खोलापुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरी प्रकरणात गणेशचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. रविवारी गुप्त सूचनेवरून सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे एपीआय कांचन पांडे, एएसआय दिलीप वाघमारे, जमादार गणेश काळे, पोलीस नाईक चैतन्य रोकडे, प्रयास वाघमारे, दीपक श्रीवास, संदीप देशमुख व नीलेश गुल्हाने यांचे पथकाने सापळा रचून आरोपी गणेश साहूला मसानगंज परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याजवळून घरफोडीतील काही साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)यापूर्वी अर्धा किलो सोने, ४० किलो चांदी जप्त गणेश साहू या कुख्यात चोराला २००६ पूर्वी पोलिसांनी एका चोरी प्रकरणात अटक केली. त्यावेळी त्यांच्याजवळून अर्धा किलो सोने व ४० किलो चांदीची भांडी पोलिसांनी जप्त केली होती. त्यानंतर गणेश फरार झाला होता. नाव बदलून राहतो गणेश कुख्यात चोर गणेश साहूला मसानगंज परिसरात अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोपी गणेश हा विविध परिसरांत नाव बदलून राहत होता. गणेश हा एकटाच असल्यामुळे तो कुठेही नाव बदलून भाड्याच्या घरात राहत होता. कधी मुन्ना तर कधी विजय तर कधी रज्जाक अशा विविध नावाने त्याची ओळख आहे. शहरात रात्रीचा फिरून तो घरफोड्या करीत होता.
नऊ वर्षांपासून फरार असणारा कुख्यात चोर जेरबंद
By admin | Updated: August 25, 2015 00:20 IST