करडी नजर : ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यानचे बँक विवरण तपासणारअमरावती : हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही धनदांडग्यांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. सोने खरेदी-विक्रीचे हे व्यवहार अलिखित असल्यामुळे ‘इन्कम टॅक्स’ विभागाकडून त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. परिणामी सराफा व्यवसायिकांच्या व्यवहारावर प्राप्तीकर विभागाची करडी नजर आहे.चलनातील बंद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा सराफा बाजारात छुप्या मार्गाने चालत आहेत. जुने चलन घेऊन सराफा व्यावसायिक चढ्या दरात सोनेविक्रीचा धंदा करीत आहेत. १२ ते १५ हजार रूपये प्रतितोळा असा अधिक दर घेऊन सोने विकले जात आहे. मात्र, जुने चलन बाद झाल्यानंतरही ते चलन व्यवहारात वापरले जात असल्यामुळे हीबाब शासनाच्या धोरणाला छेद देणारी ठरली आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिक प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत. या व्यावसायिकांना आयकर विभाग आता हजार-पाचशेच्या नोटा चलनातून ९ नोव्हेंबर रोजी बाद झाल्यापासून तर ३० डिसेंबरपर्यंत दरदिवसाचा व्यवहार म्हणजेच बँक खात्याचे विवरण मागणार आहे. केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने दिलेल्या सूचनेनुसार प्राप्तीकर विभागाने सराफा व्यावसायिकांना नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. बँक आणि टपाल खात्यालाही ३१ जानेवारी २०१७ पर्यतचे व्यवहार स्टेटमेंट प्राप्तीकर विभागाला सादर करावे लागणार मुसक्या आवळण्याची तयारी अमरावती : सराफा व्यावसायिकांना नोटीस बजावल्यानंतर त्यांच्याकडून व्यवहाराचे येणारे विवरण आणि बँकेने पाठविलेल्या स्टेटमेंट्सची ‘क्रॉस’ तपासणी प्राप्तीकर विभाग करणार आहे. प्राप्तीकर कायद्याच्या ‘नियम ११४ ई’ मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर याकालावधीत एखाद्या व्यक्तिने एका किंवा अनेक चालू (करंट) खात्यात साडेबारा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा भरणा केला असेल तर त्याची माहिती बँका आणि टपाल खात्याने ‘इन्कम टॅक्स’ विभागाला कळविणे बंधनकारक आहे. असे न केल्यास बँका, टपाल खात्याविरुद्ध प्राप्तीकर विभाग केंद्र सरकारकडे अहवाल पाठविणार आहे. चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजाराच्या नोटांचा आणि सोनेविक्रीचा नियमबाह्य व्यवहार शमविण्यासाठी प्राप्तीकर विभागाने सराफा व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याची रणनिती आखली आहे. पहिल्या टप्प्यात नोटीस बजावून सराफा व्यावसायिकांना त्यांची बाजू प्राप्तीकर विभाग जाणून घेणार आहे. ‘नोटाबंदी’ नंतरही सराफा बाजारात सुरु असलेला नियमबाह्य कारभार रोखण्यासाठी चहुबाजूने ‘इन्कम टॅक्स’ विभागाने नाकेबंदी चालविल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात सराफा व्यावसायिकांना प्राप्तीकर विभाग नोटीस बजावणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत. (प्रतिनिधी)काळ्या पैशाबाबत शोध विभागाशी संपर्क साधाकेंद्र सरकारने पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. परंतु आजही काही ठिकाणी यानोटांचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी काळ्या पैशावर अंकुश लावण्यासाठी नागपूर येथील आयकरच्या शोध विभागात माहिती देऊन देशहिताचे कार्य करावे, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. ०७१२-२५६१७४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.आयकरचे गोपनीय ‘सर्चिंग’ सुरुआयकरने सराफा व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी अतिशय गोपनीय पद्धतीने ‘सर्चिंग’ सुरु केले आहे. यापूर्वीची आर्थिक उलाढाल नोटाबंदीनंतर बँकेचे विवरण आदी माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र चमू तैनात करण्यात आली आहे. ही चमू संपूर्ण विदर्भात धाडसत्र राबवून सराफा व्यावसायिकांच्या काळ्या पैशांवर नजर ठेवणार असल्याची माहिती आयकर विभागातील एका बड्या अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली आहे.
सराफा व्यापाऱ्यांना ‘आयकर’ बजावणार नोटीस
By admin | Updated: November 19, 2016 00:09 IST