अमरावती : कोरोनामुळे निवड समितीच स्थापन झाले नसल्याने सुमारे २०० वृद्ध साहित्यिक, कलाकार यांना मानधन मंजूर करण्याचे प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तातडीने समिती स्थापन करून याबाबतचा निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
राज्याच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने ही योजना असून जिल्हा परिषदेकडून सहनियंत्रित करण्यात येते. प्रत्येक वर्षासाठी पात्र लाभार्थींकडून अर्ज मागवले जातात. ही समिती त्याबाबत निर्णय घेऊन समितीच्या मान्यतेनंतर संबंधित कलावंतांना वर्गवारीनुसार मानधन अदा केले जाते. प्रतिवर्षी डिसेंबरअखेर हे अर्ज मागवले जातात. त्यानुसार सन २०१९-२० वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले होते. जिल्हाभरातून २०० जणांनी अर्ज केले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदांची निवडणूक लागली. अशातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी विलंब झाला. त्यामुळे पालकमंत्र्यांची नियुक्तीही विलंबाने झाली. अशातच कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबली. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तातडीने ही समिती स्थापन करून याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांना ही समिती स्थापन करावयाची आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने समन्वयातून या समिती सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.
बॉक्स
अशी असते समिती
पालकमंत्री नियुक्त व्यक्ती, ज्यामध्ये साहित्यिक किंवा कवी यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते, तर सदस्य म्हणून लोककलावंत असलेल्या तीन किंवा चार जण समितीचे सदस्य असतात. या समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केली जाते.
बॉक्स
वर्गवारीनुसार मानधन
राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून लोककलावंतांना वर्गवारीनुसार मानधन दिले जाते. यामध्ये ‘अ’ वर्गवारीतील वृद्ध कलावंताना २७५० रुपये, ‘ब’ वर्गवारीतील कलावंतांना २४५० आणि ‘क’ वर्गवारीमधील कलावंताना २१५० रुपये मानधन दिले जाते.