लोकमत ऑन दि स्पॉट
पान २ चे लिड
रॉयल्टीवर दाखविले खोटे अंतर, महसूल विभाग गप्प का?, रेती तस्करीत नाक्यांची चुकवेगिरी
नरेंद्र जावरे
परतवाडा : भातकुली तालुक्यातून लिलाव झालेल्या पोहरा पूर्णा येथील पूर्णा नदीपात्राच्या घाटातून मेळघाटात रेती नेल्याची नोंद रॉयल्टी पासवर करण्यात आली. प्रत्यक्षात व्याघ्र आणि वनविभागाच्या नाक्यावर अशा नोंदीच नसल्याचे ‘लोकमत’च्या तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाळूमाफिया संगनमताने घशात घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पूर्णा नदीपात्रातील पोहरा पूर्णा भागातील रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला. हा भाग भातकुली तालुक्याचा आहे. प्रत्यक्षात वाळू माफियांनी अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातील पात्रात मोठ्या प्रमाणात वाट्टेल तसे नियमबाह्य खोदकाम केले. त्यातून शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक करण्यात आली. हा प्रकार दस्तुरखुद्द अचलपूर महसूल विभागाच्या पथकाने उघड केला. मात्र, पात्रातील खड्ड्यांचे मोजमाप करून संबंधित मालक किंवा चोरांवर दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. पात्रात सापडलेल्या पाच ट्रकवर कारवाई केल्याची चर्चा आहे. परंतु, महसूल विभागाने अजूनपर्यंत यासंदर्भात केलेली कारवाई प्रसिद्धी माध्यमांकडे पाठवलेली नाही. विचारणा करूनसुद्धा अद्याप सांगितले नाही. त्यामुळे नदीपात्रात शेकडो ब्रास रेती चोरून केलेल्या खोदकामाला जबाबदार कोण? संगनमताने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा बरीच बोलकी आहे. सेमाडोह, हरिसाल, बिहाली व इतर नाक्यावर ‘लोकमत’ने रजिस्टरची तपासणी करून माहिती घेतली असता, रेती नेल्याच्या नोंदीच नसल्याचे उघड झाले आहे.
बॉक्स
एकच रॉयल्टी, अनेक ट्रीप
एका रॉयल्टी पासवर दोन ब्रास रेतीची नोंद केली जाते. मात्र, प्रत्यक्षात ट्रकमध्ये तीन ब्रास रेती नेऊन दिवसभर तीन ते चार ट्रीप केल्या जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने पूर्वीच उघड केला. यातून दररोज शेकडो ब्रासची रेती चोरीला जात असल्याचा हा प्रकार आहे.
बॉक्स
रॉयल्टीवर मेळघाट, मात्र नाक्यावर नोंद नाही
रॉयल्टी पास बनविताना शंभर ते दीडशे किलोमीटरचे अंतर दाखविण्यात आले. अशा अनेक पास आहेत, दूरचे अंतर दाखवून किमान सहा ते सात तास वेळ टाकण्यात आला. धारणी, सावलीखेडा, खापरखेडा अशी गावे दाखविण्यात आली. मेळघाटात वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या नाक्यावर कुठल्याही गौण खनिजाची नोंद घेतल्यावरच ट्रक व इतर वाहनांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी बिहाली, सेमाडोह, हरिसाल, धामणगाव गढी, मेमना, डोमा, भांडुप, भोकरबर्डी, ढाकना, खोंगडा या ठिकाणी नाके आहेत. या कुठल्याच नाक्यावर नोंद नसल्याचे ‘लोकमत’च्या तपासणीत उघड झाल्याने महसूल यंत्रणा गप्प का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बाहेरून किंवा आतून वनउपज, गौण खनिज, रेतीची वाहतूक असेल, तर तपासणी नाक्यावर रॉयल्टी व कागदपत्रांची तपासणी करून रजिस्टरमध्ये नोंद घेण्यात येते. तसा शासकीय नियम आहे. त्यानंतरच प्रवेश देण्यात येतो.
- कमलेश पाटील,
सहायक वनसंरक्षक,
सिपना वन्यजीव विभाग परतवाडा