गणेश देशमुख - अमरावतीअविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे शांततेचे आवाहन करून सुरक्षिततेची हमी द्यायला हवी होती; तथापि त्यांनी हे महत्त्वाचे कर्तव्य टाळले. बुधवारी जे घडले त्याची वार्ता शहरभरात वाऱ्यासारखी पसरली. काय घडले हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. दस्तुरनगर, यशोदानगर, मोतीनगर, राजापेठ अशा जवळपासच्या भागातील अनेक मंडळी घटनास्थळी पोहोचली. घटना घडून तीन तास उलटले तरी आत्ताच घटना घडली असावी, अशा स्वरुपाची मोठी गर्दी दस्तुरनगर आणि यशोदानगर चौरस्त्यावर बुधवारी बघता येत होती. जी मंडळी घटनास्थळी जाऊ शकली नाही किंवा जाण्याच्या भानगडीत ज्यांना पडायचे नव्हते, अशा तमाम मंडळींनाही नेमके काय घडले हे जाणून घ्यायचे होते. घरातील महिला, मुली यांनाही सुरक्षेच्या दृष्टीने वास्तव अवगत करून घ्यावयाचे होते. अंबानगरीने यापूर्वी अशाच घटनांचे गंभीर पडसाद अनुभवले असल्यामुळे यावेळीही सामान्यांच्या काळजात अनामिक हुरहुर होती. वास्तवाची माहिती आणि सुरक्षिततेची हमी सर्वांना हवी होती. बुधवारी सुमारे पाच वाजता घडलेल्या या घटनेनंतर फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्राईम ब्रान्च, क्यूआरटी आणि चार्ली कमांडोज् पोहोचले. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रियाजुद्दीन देशमुख आणि क्राईम ब्रान्चचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी कुशलतेने स्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेनंतर अनेक तास रस्त्यावर गर्दी असली तरीही पुन्हा अघटीत घडणार नाही याची दक्षता बाळगण्यात हे दोन्ही अधिकारी यशस्वी ठरलेत. घटनास्थळी स्थिती नियंत्रणात आलेली असताना शहरभरात मात्र अफवा आणि चर्चांना उधाण येऊ लागले. चौकाचौकांत, दुकानांवर, पानटपऱ्यांवर, गल्ली-मोहल्ल्यांत चर्चा होत्या त्या केवळ दसुतुरनगरातील हिंसेच्याच. ज्याला जे कळले, त्याने ते सांगितले. भयंकर घटना सांगताना त्यातील 'भयंकरपणा' वाढतच गेला. सामान्यांची मने भयभीत झाली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात चौकशी होऊ लागली. 'आमचे घर तिकडेच आहे, त्या रस्त्याने आता जावे की नाही', असले प्रश्न आम्हाला विचारले जाऊ लागले.
धुमसणारे शहर अन् पोलीस आयुक्तांचा 'नो रिप्लाय'
By admin | Updated: November 6, 2014 22:46 IST