स्थानिकांना द्यावी संधी : पिंगळाई गडावरील काँग्रेसच्या बैठकीत ठरावअमरावती : जि.प., पं.स. निवडणुकींमध्ये बाहेरचे उमेदवार आयात करून लादण्यापेक्षा स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी, असा ठराव मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीच्या गुरूवारी पिंगळाई गडावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते व माजी आमदार भैयासाहेब ठाकूर होते. तालुक्यातील एकूण पाच सर्कलमध्ये अनेक उमेदवारांनी हक्क सांगितला. मात्र, हक्काचे सर्कल राखीव झाल्यामुळे तालुक्याबाहेरील उमेदवार सुद्धा इथे अतिक्रमण करून स्वत:चे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तालुक्याबाहेरील काही व्यक्तींद्वारा या उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. परंतु यापद्धतीने बाहेरील उमेदवार लादल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो. यापार्श्वभूमिवर तालुका काँग्रेस कमिटीने तातडीने बैठक घेऊन बाहेरील उमेदवार लादण्यात येऊ नये, असा ठराव घेतला. -तर विरोधकांकडून होईल अपप्रचार स्थानिक कार्यकर्ते पक्षाचे निष्ठेने काम करीत आहेत. त्यांना डावलून तालुक्याबाहेरील उमेदवारांना संधी दिल्यास निष्ठावंतांची नाराजी होते. पक्षाकडे स्थानिक उमेदवार नसल्याने बाहेरचा उमेदवार लादला, असा अपप्रचार विरोधकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते, अशी प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली. निवडणुकांमध्ये प्रचाराची दिशा कशी असावी, यावर मंथन करण्यात आले. यावेळी स्थानिकांनाच संधी द्यावी, बाहेरचा उमेदवार लादू नये, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ती जिल्हा व प्रदेश कमिटीला कळविणार आहोत.- भैयासाहेब ठाकूर, काँग्रेस नेते, माजी आमदार
आयात उमेदवार नको
By admin | Updated: January 13, 2017 00:03 IST