पत्रपरिषद : रवी राणांची माहिती, मेट्रो रेल्वे ड्रीम प्रोजेक्ट ठरणार अमरावती : महापालिकेची सत्ता भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात दिल्याने शहर विकासापासून दूर राहिले. मात्र येत्या निवडणुकीनंतर महापालिकेला भ्रष्टाचार आणि कुपोषणमुक्त करणार, असा निर्धार आ. रवि राणा यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला. महापालिका, जि.प. व पं.स. निवडणुका युवा स्वाभिमान पार्टीच्या बॅनरखाली लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ.राणांनी नव्या वर्षात विकासाचे संकल्प घेत असल्याची ग्वाही देताना बडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसी दरम्यान मेट्रो हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पूर्णत्वास आणणार असल्याचे स्पष्ट केले. सुमारे १५०० कोटी रुपये याकरिता खर्च अपेक्षित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे साकारताना जमीन अधिग्रहणाचा विषय राहणार नाही. एमआयडीसी, नगरविकास विभाग व एमएसआरडीसी असे संयुक्तपणे निधी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा विकास करताना मेट्रो हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. छत्री तलाव परिसराचा विकास, बडनेरा येथे स्वतंत्र तहसील, अमरावती-बडनेरा महापालिका नामांतर, मालटेकडी व भीमटेकडी परिसर विकास, राजकमल ते बडनेरा ९० कोटी रुपये खर्चून सिमेंट रस्ते, संजय गांधी निराधार योजना, विधवा, परितक्त्या व वृद्धाना दोन हजार रुपये मानधन, हाकर्स झोन, झोपडपट्टी पुनर्वसन योजना यासह शहराचा विकास साधणार असल्याचे आ.राणा म्हणाले. मात्र महापालिका, जि.प. व पं. स. निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे निश्चित केले आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल देखील केली आहे. आतापर्यत महापालिका ४९५, पंचायत समिती ३८० तर जिल्हा परिषदेसाठी १३५ जणांनी अर्जाचे उचल केल्याची महिती आ. राणांनी दिली. परंतु उमेदवारी निश्चित करताना त्याचे सामाजिक कार्य, उमेदवारांची पात्रता, जनतेत स्थान व मुलाखतीनंतर उमेदवारी ठरविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले. युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जीतू दुधाने, शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, सचिन भेंडे, नितीन बोरेकर यावेळी उपस्थित होते.
महापालिकेला भ्रष्टाचारमुक्त करणार
By admin | Updated: January 4, 2017 00:23 IST