अमरावती : जिल्ह्यात आॅक्टोबर २०१३ नंतर म्हणजेच नऊ महिन्यांनी प्रथमच रेशन दुकानात साखर उपलब्ध होणार असल्याची गोड बातमी आहे. शनिवार २६ व रविवार २७ जुलै रोजी जिल्ह्यात साखरेचा पुरवठा होत असून शिधाकार्ड धारकांना आॅगस्ट महिन्यात रेशनकार्डावर साखर मिळणार आहे. यासाठी जिल्हानिहाय ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खासगी पुरवठादाराकडून (एनसीडेक्स स्पॉट एक्सचेंज लिमीटेड) द्वारा साखर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पुरवठा विभागाने ‘आॅनलाईन’ साखरेची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी दिवाळी सणाला रेशन दुकानातून साखर वितरीत करण्यात आली होती. तेव्हापासून रेशन दुकानात साखर उपलब्ध झाली नाही. वास्तविकता साखरेची खरेदी प्रक्रिया रोखीच्या स्वरूपात असते. यासाठी शासनाद्वारे दर महिन्याला पुरवठादार सुचविण्यात येतात. जिल्ह्याचा पुरवठा विभाग जेव्हा या पुरवठादार कारखान्यांसोबत संपर्क साधतात तेव्हा कोणतेही कारण दर्शवून साखरेचा पुरवठा करण्यास त्यांच्याकडून नकार मिळतो. नऊ महिन्यांपासून हीच प्रक्रिया सुरू होती. यावेळी शासनाने नोंदणीकृत साखर पुरवठादारांकडून साखर खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय ई-प्रक्रिया दि. १७ जुलै रोजी राबविण्यात आली. यामध्ये यशस्वी ठरलेल्या साखर पुरवठादारांशी करार करण्यात आला. जिल्ह्याच्या पुरवठा विभागाद्वारे साखरेची मागणी नोंदविण्यात आली आहे. साखरेचा साठा शासकीय धान्य गोदामात शनिवारपासून दोन दिवसपर्यंत येणार आहे. त्यानंतर तालुक्यात हा पुरवठा वितरीत होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्याची साखर आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)
नऊ महिन्यांनी साखर झाली गोड
By admin | Updated: July 26, 2014 01:05 IST