अमरावती : वरूडनजीच्या महेंद्री ज़ंगलात शेकदरी गव्हाणकुंड वनबीटमध्ये २२ डिसेंबर २०२० रोजी एका पाच वर्षीय नर वाघाच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींची न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात रवानगी झाली आहे. मात्र, बिबट हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार अद्यापही पसार असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र- मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात अवैध दारू वाहतुकीसाठी बिबट्याची हत्या करण्यात आली, असे तपासात वनविभाग, पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वरूडनजीकच्या भेमडी येथील दोन आणि मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील कुणबीखेडा येथील एक असे प्रारंभी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, बिबट हत्या प्रकरणातील उर्वरित चार आराेपी पसार असल्याने वनविभाग व पोलीस अन्य आरोपीच्या शोधात होते. दरम्यान, गाेपनीय माहितीच्याआधारे या प्रकरणातील आरोपी मध्यप्रदेशात दडून बसल्याचे कळले. त्यानुसार वनविभाग, पोलीस चमुने मंगळवारी १९ जानेवारी रोजी सापळा रचला आणि चार आरोपींना ताब्यात घेतले. आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
--------------------
आरोपींच्या घरांची झाडाझडती
पोलीस आणि वनविभागाने मध्य प्रदेशातील शुक्रवार, २२ जानेवारी रोजी ताब्यातील चार आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. बिबट्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र, हत्यारे जप्त करण्यात आली. दरम्यान महेंद्री जंगलात बिबट्याची हत्या झाली. त्या घटनास्थळी वनाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी सहायक वनसंरक्षक लिना आदे- गोंडाणे, वरूडचे वनपरिक्षेत्राधिकारी लांबाडे आदी उपस्थित होते.
----------------
मूख्य सूत्रधार गुजरातमध्ये
बिबट हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गुजरात राज्यात पसार झाल्याची माहिती आहे. त्यानुसार वन विभागाने अटकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नऊ आरोपींना अटक केली, पण बिबट्याचे अवयव वनविभाग जप्त करू शकले नाही. त्याकरिता वनविभागाने मुख्य सूत्रधाराचा कसून शोध चालविला आहे. या प्रकरणाच्या तपास अधिकारी एसीएफलिना आदे- गोंडाणे यांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. अद्यापही आरोपींची नावे जाहीर केली नाही, हे विशेष.
----------------------
महेंद्री जंगलात बिबट हत्याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ आरोपी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी कारागृहात रवाना झाले. बिबट हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा शोध सुरूच आहे.
- चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक, अमरावती.