कार्यशाळा : माजी अधिष्ठाता जगताप यांचे प्रतिपादन अमरावती : एनसीटीईने बी.एड्. व एम.एड् अभ्यासक्रमाचा नव्याने कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार त्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांमध्ये व्हावी, असे मत सोलापूर विद्यापीठाचे शिक्षण विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता ह. ना. जगताप यांनी व्यक्त केले. विद्यापीठाचा पदव्युत्तर शिक्षण विभाग व मानव संसाधन व विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात 'बी.एड्. व एम.एड्. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी' या विषयावर शुक्रवारी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कुलगुरू मोहन खेडकर, सोलापूरचे कस्तुरबाई शिक्षण महाविद्यालयाचे अभिन बोदाळे, मानव संसाधन व विकास केंद्राचे संचालक सुरेंद्र माणिक, पदव्युत्तर शिक्षण विभागप्रमुख गजानन गुल्हाने उपस्थित होते.कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना ते म्हणाले, डी.एड्. अभ्यासक्रमातील असमतोलामुळे त्यावर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार न्यायमूर्ती वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. समितीने डी.एड्. व बी.एड्. अभ्यासक्रमात, पुस्तकात व कालावधीत दुरुस्त्यां सुचविल्यात, त्यानुसार एनसीटीईने त्यासाठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, या उद्देशाने कार्यशाळेत होणारे विचारमंथन महत्त्वपूर्ण व सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मोहन खेडकर म्हणाले, सशक्त भावीपीढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे. गुरू म्हणून शिक्षकांचे काम सर्वश्रेष्ठ आहे. विद्यादान करणे, त्यातून विद्यार्थी घडविणे अशा प्रकारे महान कार्य शिक्षक करीत असतात. त्यामुळे शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून तो आदर्श ठेवून शिक्षकांनी आपले कार्य करावे, असे आवाहन कुलगुरुंनी केले. शिक्षण, संशोधन यासह प्रशासनसुध्दा शिक्षकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. स्वत:ला परिपक्व शिक्षक बनवा, सर्व गोष्टी आत्मसात करा आणि स्वयंप्रेरणेने जबाबदारी स्वीकारा, असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी शिक्षकांना दिला. संचालक एन. व्ही. कुकळपवार यांनी, तर आभार सुरेंद्र माणिक यांनी मानले. (प्रतिनिधी)
बीएडएमएड अभ्यासक्रमाची नव्याने अंमलबजावणी व्हावी
By admin | Updated: October 25, 2015 00:16 IST