अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने एकाच कॉटवर दोन-दोन प्रसूत महिलांना ठेवण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच जिल्हा प्रशासनाने २00 अतिरिक्त कॉटची व्यवस्था करण्याकरिता हालचाली सुरु केल्या आहेत. बुधवारी दुपारी सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या अधिकार्यांनी डफरीन परिसराचे सर्व्हेक्षण करुन इमारतीच्या बांधकामाची रूपरेषा ठरविली
जिल्हा
स्त्री रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या पाहता इमारतीचा विस्तार करण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. ३५0 बेडची व्यवस्था असणार्या नवीन इमारतीला शासनाकडून मंजुरीही मिळाली होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही बांधकाम प्रक्रिया रखडली आहे. त्यानंतर प्राप्त निधीतून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ व २ मध्ये सुधारणा करण्यात आली. मात्र, रूग्णांकरिता अतिरीक्त बेडसहित नवीन इमारतीचे काम रखडलेलेच आहे. ‘लोकमत’ने रुग्णालयातील ही वस्तुस्थिती मांडल्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रूग्णालयाच्या आवारातील उद्यान व पाणपोई हटवून त्या जागी आता रूग्णांच्या सोयीकरिता इमारत बांधण्यात येणार आहे. बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मंडपे व कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली. यावेळी इमारत बांधकामाची रुपरेषा ठरविली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव उपस्थित होते. कोट्यवधी रूपये खर्च करुन ही इमारत लवकरच तयार होण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)