अमरावती : महापालिकेत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाने संख्याबळ जुळविण्याची रणनिती सुरु केली आहे. अपक्ष सदस्यांना आपल्या बाजुने करण्यासाठी शक्कल लढविली जात असून ‘लक्ष्मी’ त्यांच्या दारी पोहचविण्याची तयारी नेत्यांनी केल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये आघाडी होऊन महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अविनाश मार्डीकर यांच्या गटनेतेपदाला स्थगनादेश दिल्यामुळे आता महापालिकेत राजकीय फासे उलट्या दिशेने पडू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसची आघाडी संजय खोडके की आ. रवि राणा यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत राहते, यावरही बरेच राजकारण अवलंबून आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरुन येत्या विधानसभेचे गणित जुळविले जात असल्याने ही निवडणूक शहरासाठी अतिशय महत्वाची मानली जात आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाने संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस फ्रंटचे गटनेते अविनाश मार्डीकर यांच्या पदाला स्थगनादेश दिल्याने हा निर्णय म्हणजे खोडके यांच्याकरिता राजकीय हादरा देणारा मानला जात आहे. वजन वाढविण्यासाठी दबावअमरावती : महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुनील काळे हे पक्षादेश काढणार असल्याने आ. रवी राणा ठरवतील त्या सदस्याला महापौर पदाची संधी मिळणार असल्याचे चित्र आहे. मात्र सुनील काळे यांचा आदेश मानायचा नाही, असे अविनाश मार्डीकर यांनी निर्णय घेतला आहे. जास्त संख्येने सदस्य हे खोडके गटाच्या बाजुने असल्याने सुनील काळे यांचा निर्णय मान्य नाही, अशी भूमिका या १६ सदस्यीय गटाने घेतल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजुने ७ सदस्य आहेत. मात्र राष्ट्रवादीत असलेल्या अंतर्गत भांडणाचा लाभ घेण्याची तयारी काँग्रेस, शिवसेना , भाजप, जनविकास- काँग्रेस, बसपा करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वच पक्षात असलेल्या अपक्षांना घेरण्याचीे तयारी जोरात सुरु झाली आहे. अपक्ष सदस्यांना आपल्या तंबूत कसे आणता येईल, याचे आखाडे बांधले जात आहे. मात्र आ. रवी राणा यांनी काँग्रेससोबत आघाडी करून आपल्या समर्थक सदस्यांना महापौर कसे मिळेल, याची वरिष्ठ स्तरावरुन मोर्चेबांधणी चालविली आहे. यापूर्वी संजय खोडके गटात सामील असलेल्या तीन अपक्ष सदस्यांना आ. राणा हे आपल्या तंबूत खेचून आणण्यात यशस्वी झाल्याची माहिती आहे. आता खोडके यांच्या गटात केवळ १३ सदस्य शिल्लक राहिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या संख्या बळावर महापालिकेत खोडके हे सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणता राजकीय ‘गेम’ करतात, याकडे लक्ष लागले आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ही अपक्ष सदस्यांचा मतांवर बऱ्यापैकी अवलंबून आहे. त्यामुळे अपक्ष सदस्यांची मर्जी सांभाळत सत्ता प्राप्तीचे समिकरण जुळण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँगेस फ्रंटमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाचेही परिणाम महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत होण्याची शकयता आहे. आघाडीच्या जुन्या करारानुसार महापालिकेत सत्ता स्थापन व्हावी, यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशिल आहेत. मात्र राष्ट्रवादी फ्रंटमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असलेल्या ७ सदस्यांना संजय खोडके यांच्या गटाचे नेतृत्व मान्य नसल्याने हे सदस्य वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. या सात सदस्यांमध्ये महापौर पदासाठी सपना ठाकूर व जयश्री मोरय्या यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अविनाश मार्डीकर यांच्या गटनेते पदावर स्थगनादेश दिल्याने आता सुनील काळे हे महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षादेश काढणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संजय खोडके यांच्या गटाशी हातमिळवणी न करता काँग्रेसने महापौर, उपमहापौर पदाचे गणित जुळवून आणावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. आ. रवी राणा यांनी जुळवून आणलेल्या नव्या समिकरणानुसार काँग्रेसने उपमहापौरपद घ्यावे आणि राष्ट्रवादीच्या सात सदस्य संख्येतील एका महिला सदस्यांना महापौर पद द्यावे, असा फार्मूला पुढे आणला आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी लागणारे आवश्यक संख्याबळ जुळविण्याची हमी आ. राणा हे घेत असल्याची माहिती आहे. अपक्ष सदस्यांचे बळ जुळविण्याची तयारी आ. रवी राणा यांनी केल्याने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत वेगळे राजकरण होणार असल्याचे दिसून येते.
अपक्षांचा घोडेबाजार
By admin | Updated: September 6, 2014 01:24 IST