लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : दोन वर्षापूर्वी शहरात मोठ्या थाटामाटात सुरू झालेली नीरज मल्टिपर्पज बँकेचे व्यवहार अडचणीत आले असून, ग्राहकांच्या लाखोच्या ठेवी परत देण्यास बँक संचालक टाळाटाळ करीत असल्याची तक्रार खुद्द बँक शाखा व्यवस्थापकांनीच चांदूर रेल्वे पोलिसात केली आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
सूत्रांनुसार, स्थानिक गाडगेबाबा मार्केटमधील एका इमारतीत ११ सप्टेंबर २०२३ रोजी अमरावती येथील नीरज मल्टिपर्पज बँकेची सुरवात झाली होती. त्याचे संचालक युवराज भगवान गिन्हे असल्याचे कळते. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या नीरज बँकेजवळ कोट्यवधीच्या ठेवी जमा झाल्या.
नियमित व्यवहारही लाखांच्या घरात गेला असल्याची माहिती मिळाली. या बँकेत एकूण तीन कर्मचारी आणि नऊ नियमित एजंट काम करीत होते. त्यांच्या माध्यमातून बँकेचा आर्थिक स्तर झपाट्याने उंचावला होता. परंतु, मागील महिन्यांपासून बँकेत पैसे विड्रॉल करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना त्यांचेच पैसे परत मिळण्यासाठी अडचण जात असल्याचे लक्षात आले. पैसे परत देण्यास बँक टाळाटाळ करीत असल्याचे जाणवल्याने सर्वच ग्राहकांनी आपल्या ठेवी परत मागण्यास सुरुवात केली.
शाखा व्यवस्थापकाने संचालक मंडळाकडे पैशांची मागणी केली असता, त्यांनाही मुख्य कार्यालयाकडून पैसे वेळेवर परत न मिळाल्याने त्यांनी बँकेचे कर्मचारी व एजंटच्या साहाय्याने पोलिसात बँकेकडून पैसे परत मिळत नसल्याबाबत तक्रार केली. बँकेच्या एकंदरीत व्यवहारावर ग्राहकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बँकेच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता, त्यांचा फोन बंद आढळून आला.
खातेदारांचा संताप संचालक स्विच ऑफबँकेच्या एकंदरीत व्यवहारावर खातेदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत बँकेच्या संचालक मंडळांशी संपर्क साधावा तर त्यांचे मोबाइल बंद असल्याने खातेदार संतापले आहे.
"बँकेचे पैसे वेळोवेळी संचालक मंडळ घेऊन गेले. परंतु, जेव्हा ग्राहकांच्या विड्रॉलसाठी आम्ही संचालकांकडे पैशांची मागणी केली तेव्हा वेगवेगळ्या तारखा देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. शाखा व्यवस्थापक व कर्मचारी म्हणून आमचेही लाखो रुपये या बँकेत गुंतले आहेत. आम्ही सर्वांनी पोलिसांना सूचना दिली."- सुधा हिवराळे, शाखा व्यवस्थापक
"बँकेबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. परंतु, बँकेचे संचालक हे बाहेरगावी असल्याने संचालक मंडळाच्या जबाबानंतर आम्ही पुढील कार्यवाही करू."- अजय आकरे, ठाणेदार