ग्राहकांची कुचंबणा : तूर डाळ प्रति किलो २२५ रुपये, ग्राहक हैराणप्रदीप भाकरे अमरावतीआप्तेष्टांना कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण पत्रिकेद्वारे देण्याची पध्दत आहे. मात्र, आता हीच पत्रिका दाखवून तुम्हाला तूर डाळीची खरेदी करावी लागणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण, हे खरे आहे. सद्यस्थितीत १० ते १५ किलो तूर डाळ खरेदी करायची असेल तर कॅम्प स्थित ‘डी-मार्ट’ एवढी डाळ खरेदी करण्याचे कारण विचारले जाते. सामान्य ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दरात तूर डाळ मिळावी व डाळीची साठेबाजी होऊ नये, असा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते आहे. ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या तूर डाळीचे दर गगनाला भिडले आहे. किरकोळ बाजारात ६ महिन्यांपूर्वी ८५ ते १०० रुपये किलोप्रमाणे उपलब्ध असलेली तूर डाळ चक्क २०० ते २२५ रुपयांत विकली जात आहे. दरदिवशी तुरीचे दर वाढत असल्याने किमान १० किलो डाळ घरी असावी, या विचाराने ‘डी-मार्ट’कडे जाणाऱ्या ग्राहकांचा ‘फक्त २ किलो’च्या अटीमुळे हीरमोड होत आहे. अटी-शर्तीत ग्राहकांचा हिरमोडअमरावती : किरकोळ बाजारात फटका डाळीचा दर प्रती किलो २२५ रूपये असून हीच डाळ ‘डी-मार्ट’ मध्ये १८३ रुपये दराने उपलब्ध आहे. ‘डी-मार्ट’मध्ये १६० रूपये प्रती किलोपासून तूर डाळ उपलब्ध असल्याने येथे ५ ते ७ किलो डाळ एकाचवेळी खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. मात्र, येथे अटी घालून डाळीची विक्री होत असल्याने ग्राहकांचा हिरमोड होत आहे. ३ दिवसांपासून ‘वॉलमार्ट’मध्ये तूरडाळ उपलब्ध नव्हती. घाऊक मार्केटमध्येही तूर डाळीची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. दसरा-दिवाळीच्या कालावधीत तूर डाळीचा भाव प्रती किलो २२५ रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या भोजनातून ‘वरण’ हद्दपार झाले आहे. तूर डाळीच्या वाढत्या दरामागे व्यापाऱ्यांची खेळी असून साठेबाजांवर नियंत्रण नसल्याने ग्राहकांची परवड होत आहे. सध्या किरकोळ बाजारात १९० ते २२५ रु. प्रति किलो दराने तूर डाळीची विक्री होत आहे. मागिल १५ दिवसांत तूर डाळीच्या विक्रीत सुमारे ५० टक्के घट झाल्याचे विक्रेते सांगतात. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूर डाळीसोबत मूग, उडिदाच्या डाळीने उच्चांक गाठला आहे. दरम्यान एखाद्या विक्रेत्याला ठराविक प्रमाणात तूर डाळीची विक्री करता येते का? अशी मर्यादा घातली जाणे अधिकृत आहे का, याबाबत बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षकांशी संपर्क होऊ शकला नाही. सणासुदीला डाळींचे वाढलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने साठ्याच्या मर्यादा घातले आहे. नफेखोरांवर कारवाई करण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र, जिल्हा पुरवठा प्रशासनाला तसे निर्देश न मिळाल्याने तूर डाळीच्या साठेबाजीवर नियंत्रण उरलेले नाही. काही बड्या व्यापाऱ्यांनी मोठा साठा करून ठेवल्याचा आरोपही किरकोळ विक्रेते करीत आहेत. बडनेरा रस्त्यावरील ‘भारती वॉलमार्ट’मध्येही गेल्या ३-४ दिवसांपासून तूर डाळ उपलब्ध नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तूर पोहोचली १२,२०० वरबाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल १२,२०० रूपयांचा उच्चांकी दर मिळत आहे. लाल तुरीला किमान १३ हजार ते १३, ८१६ रुपय भाव मिळाला. गजर तूर ९ हजार, कमला १०,५०० रुपये दराने मिळत आहे. दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यानंतर दर पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
१० किलो तूर डाळ हवी? पत्रिका दाखवा!
By admin | Updated: October 20, 2015 00:11 IST