मेळावा : प्रफुल्ल पटेल, अरुण गुजराथी, अनिल देशमुखांची उपस्थितीअमरावती: राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षबांधणीला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमिवर बुधवारी आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षच पर्याय असल्याचे निक्षून सांगितले. सर्वांना पदे मिळणे शक्य नसले तरी पत नक्कीच मिळेल, ही बाब जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी यांनी स्पष्ट केली. गुजराती यांनी ‘धूल चेहरे पर और वो आर्इंना पोछते है’ असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात बुधवारी राष्ट्रवादी काँगे्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, वसुधा देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, जिल्हा प्रभारी वसंत घुईखेडकर, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, राजकुमार पटेल, जि. प. सभापती वैशाली विघे, नंदू वासनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, गणेश खारकर, प्रदीप राऊत, राजेश शिरभाते, निलिमा महल्ले, अनिल ठाकरे, सुनील काळे, संतोष महात्मे, ऋषिकेश वैद्य, प्रल्हाद सुंदरकर, गणेश राय, विनेश आडतिया, गणेशदास गायकवाड, गजानन रेवाळकर आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या प्रारंभी नवनियुक्त खा. प्रफुल पटेल यांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात भलामोठा हार घालून सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रभारी अरुण गुजराथी यांनी शेरो शायरीतून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणताना राष्ट्रवादीचे निर्णय आता मुंबईत नव्हे तर विदर्भातच होतील, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे डंडे खा पण राष्ट्रवादी वाढवा असा सल्ला कार्यकर्त्यांना त्यांनी दिला. यावेळी खा. प्रफल पटेल यांनी राष्ट्रवादी विदर्भात क्रमांक १ चा पक्ष उभा राहील. नगरसेवक ते खासदार, मंत्री असा माझा प्रवास असला तरी ही देण शरद पवार यांची असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)'एकला चलो'ची हाकराष्ट्रवादीने काँग्रेससोबत आता मैत्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अथवा आमदारकीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असे संकेत नेत्यांनी दिले आहे. ‘एकला चलो’मुळे कार्यकर्त्यांना भरपूर वाव, संधी सुद्धा मिळणार आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही, ही ओरड थांबणार आहे.
राष्ट्रवादीत पद नाही पत मिळेल
By admin | Updated: June 30, 2016 00:09 IST