ग्रामजयंती : नव्या युगाच्या निर्मितीसाठी राष्ट्राला दिला मंत्रअमरावती : ग्रामोन्नतीच्या दृष्टीने सर्वांगीण ग्राम विकासाची सूत्रबद्ध, आदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना ग्रामगीतेसारख्या आमूलाग्र परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या चिंतनशील, संवेदनशील महाकाव्यातून ४१ विषय विधायक, क्रियात्मक स्वरुपात प्रगट करणाऱ्या युगमानव, द्रष्टापुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस 'ग्रामजयंती' म्हणून ३० एप्रिल २०१६ ला संपूर्ण भारतभर गावागावातून अनेकानेक विधायक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येत आहे.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस राष्ट्रसंतांनी संस्थापित केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या प्रचारक, कार्यकर्ते व त्यांच्या प्रेमीजनांनी साजरा करण्याचे सूतोवाच राष्ट्रसंतांसमोर केले. तेव्हा मार्मिकपणे राष्ट्रसंतांनी भावना सर्वांसमोर मांडल्या. राष्ट्रसंत म्हणाले-''मित्रांनो ! तुकडोजींची जयंती साजरी करण्याची प्रथा मला अमलात आणू द्यायची नाही. माझा जन्मदिवस साजरा करण्याचे हे नवे खूळ मंडळाने निर्माण करणे म्हणजे माझे मरण चिंतनेच होय. मी आपणाला आधी सांगू ठेवतो की 'ग्रामजयंतीच्या' निमित्ताने तुकड्याबुवांची पूजा करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमचे माझे जमणार नाही. मी माझ्या मनात मानव मात्राचे उत्थान करणारी देवता शोधत होतो. यादृष्टीने विचार करू लागलो तेव्हा मानवजातीच्या कल्याणाचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने 'ग्रामदेवता' ही मला योग्य वाटली. मला गावा-गावात विठ्ठल रखुमाईचे दर्शन होत आहे. मुले-बाळे पुंडलिकांच्या रुपात दिसताहेत. ग्रामस्थांच्या वेदनांचं संवेदन मी प्रत्यक्ष अनुभवित आहे. अशा माझ्या ग्रामदेवतेला मी सेवेचं फूल वाहिलेलं आहे. मंदिरात आता देव राहिलेला नसून तो घरा घरातून, झोपड्या-झोपड्यांतून काय घडत आहे हे पाहण्यासाठी निघाला आहे. याच विशाल भावनेने मी माझ्या जन्म दिवसाला ग्रामजयंती म्हटले आहे. ग्रामजयंती ही देशातील प्रत्येक नगारिकांपर्यंत पोहचली पाहिजे, असा माझा मानस आहे. ग्रामोत्थानाच दीर्घचिंतन नव्या युगाच्या नवनिर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून एक नवा मंत्र ग्रामजयंती निमित्ताने देशाला दिला. वं.राष्ट्रसंतांचा श्वास-न-श्वास अहोरात्र गावांना तीर्थरुप बनविण्यासाठीच झटला. तो थकला नाही की भागला नाही.गावात रामधून निघाली पाहिजे. गाव स्वच्छ दिसल पाहिजे, पांदण, नाल्या स्वच्छ दिसल्या पाहिजे. गावात, चरसंडास असले पाहिजे. गुड्या-तोरणांनी गाव सजलं पाहिजे. या विधायक कार्यक्रमाद्वारे माझी ग्रामजयंती साजरी व्हावी हा राष्ट्रसंतांचा अट्टाहास होता. यासाठी राष्ट्रसंत म्हणतात- ''गाव हे विश्वाचे ब्रह्मांडाचे घटक आहे. म्हणून मी स्वत:च्या कार्यक्रम सोहळयाला ग्रामजयंतीचे स्वप्न दिले आहे. गाव सजले चांगले झाले की स्वच्छ बनले सर्वांगनी सुखी समृध्द झाले तर मला माणे पूजन झाल्या सारखे वाटते. जसे माझ्या शरीराला आंघोळीची गरज आहे तसेच तुम्ही दररोज नव्हे तर आठ दिवसातून एकदा तरी ग्रामसफाई करा. गावाला नीटनेटके ठेवा, ध्यान-प्रार्थना करा. हे आत्म्याचे अन्न आहे, अशी माहिती अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी रुपराव वाघ यांनी दिली.
ग्रामोन्नतीसाठी राष्ट्रसंतांची हाक, गावागावासी जागवा
By admin | Updated: April 30, 2016 00:16 IST