सुरेश सवळे चांदूरबाजार
चांदूरबाजार नगरपरिषद हद्दीतील बहुतेक सर्व प्रभागांत मोठ्या प्रमाणावर लाखो रुपये खर्चून काँक्रीट रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यात आले; मात्र त्यात सध्याच्या स्थितीत पाणी वाहून जाण्याच्या ऐवजी कचऱ्याचे ढिगच दिसतात. परिणामी येत्या पावसाच्या दिवसात पाणी वाहून जाण्याला मार्गच उरला नाही. तर वस्तीतील नाल्या नियमित साफ केल्या जात नसल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या सर्व बाबी टाळण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप कुठेही बाजार ओळीत नियोजन झालेले दिसत नाही. या नाल्या पावसाच्या पाण्यामुळे धोकादायक झाल्या असून पावसाळ्यापूर्वीचे नियोजन थंडबस्त्यात पडलेले दिसत आहे. तसेही सफाई कामगारांच्या मनुष्यबळाअभावी नियमित स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा झाले आहे. प्रशासनाच्यावतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजनपूर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांचे पालन कितपत केले जाते याचे ताजे उदाहरण म्हणजे चांदूरबाजार नगरपरिषद आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही शहरातील नाल्या, गटाराची साफसफाई व पावसाळ्यापूर्वी नियोजनात्मक राबविण्यात येणारी कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे शहरवासीयांना भविष्यात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाहेरील मनुष्यबळ लावून काही नाल्यांची साफसफाई सुरू असली तरी ती योग्य प्रकारे केली जाते काय, यावर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. चांदूरबाजार शहर आणि ठिकठिकाणी साठविला जाणारा कचरा यांचा शहरातील नागरिकांसोबत जवळचा संबंध आहे. केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट न लावणे, नाल्या नियमित उपसा न करणे, साफ केलेल्या नाल्यांमधील कचरा दोन-दोन दिवस तसाच ठेवणे या सर्व बाबी शहरवासीयांना नित्याच्याच झाल्या आहेत. खरे तर या सर्व बाबींची जबाबदारी नगर परिषदेची असताना याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्टेट बँकेसमोर २७ लाख रुपये खर्च करुन काँक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करण्यात आले. तसेच पालिकेच्या जुन्या इमारत परिसरात १२ लाख रुपये खर्च करुन मुख्य नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्यातून आतापर्यंतही पाणी वाहून गेले नाही. उलट या सर्व मोठ्या नाल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. नेताजी चौक ते किसन पुतळ्यापर्यंत असलेली बंद नाली बांधकाम झाले तेव्हापासून साफ केल्या नाही. त्यामुळे पावसाचे पाणी दुकानात शिरते. याचाही विचार येथील बांधकामाच्या वेळी करण्यात आला नाही. शहरातील काही नाल्या जुन्या असून काहींवर अतिक्रमण झाल्याने त्या स्वच्छ करणे शक्य होत नाही. त्यामुळे या नाल्या पाणी वाहून नेण्याच्या कामी न येता डोकेदुखी ठरत आहेत. या समस्येकडे न.प. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.