तिवसा : स्थानिक नगरपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तूर्तास प्रशासकराज आहे. मात्र, ग्रामपंचायतची रणधुमाळी संपताच नगरपंचायतच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. त्याअनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाआघाडी व भाजपकडून चाचपणी केली जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे तिवसा हे ‘होम टाऊन’ आहे.
१७ सदस्यीय तिवसा नगरपंचायतमध्ये काँग्रेसकडे १०, शिवसेनेकडे चार तथा राष्ट्रवादी, माकप व एक अपक्ष असे पक्षीय बालबल होते. पाचही वर्षे नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. या काळात विरोधी पक्षात असलेली शिवसेनाही सत्ताधारी काँग्रेस पक्षासोबत होती. यंदाच्या निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांचे गाव तिवसा असल्याने त्यांच्या भेटी वाढल्या आहेत, तर आमदार यशोमती ठाकूर या कॅबिनेट मंत्री असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
प्रहार, वंचितही रिंगणात
या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना सुद्धा उतरणार आहे. तर वंचित बहुजन आघाडी देखील असेल. त्यामुळे निवडणुकीपुर्वी महाआघाडी व्हर्सेस भाजप असे सध्याचे चित्र असले, तरी ही निवडणूक तिरंगी, चौरंगी होण्याची अधिक शक्यता आहे.
--------------