अमरावती : मुलीचा जन्मदर वाढविणे व भ्रूणहत्या रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येते. या योजनेला निधी न आल्याने सन २०१८-१९ ते २०२१ पर्यतचे लाभार्थ्यांचे प्रस्ताव पडून आहेत.
राज्य शासनाने मुलीचा जन्मदर वाढवणे, भ्रूणहत्या रोखणे तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात १ एप्रिल २०१६ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. योजनेत मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत वडील किंवा आईने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया अथवा नसबंदी केली तर मुलीच्या नावे ५० हजार रुपये बँकेत जमा केले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१ अंतर्गत पालकांनी दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलीच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवले जातात. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीत महिला व बालकल्याण विभागाकडे ७७४ प्रस्ताव सादर केलेले आहेत. यातील २५० प्रस्ताव शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे पेंडिग पडले आहेत.
बॉक्स
शासनाकडे निधीची मागणी
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे सन २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीत ७७४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी २५० लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याकरिता शासनाकडे १ कोटी ९३ लाख ५० हजार रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा निधी अद्याप उपलब्ध झाला नाही. परिणामी लाभार्थ्यांच्या मुदत ठेवीचे प्रस्ताव पेंडिंग पडून आहेत.