अचलपूर : सांडपाणी वाहून नेणारी नाली व घराशेजारच्या कचऱ्याच्या वादातून एका ३० वर्षीय युवकाची काठीने मारहाण करुन हत्या केल्याची घटना स्थानिक विलायतपुरा येथे बुधवारी सकाळी ९ वाजता घडली. स्थानिक विलायतपुरा येथील शे. करीम शे. उस्मान (३०) असे मृताचे तर सुल्तानखॉ अनवरखॉ (६५ दोन्ही. रा. विलायतपुरा) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. बऱ्याच दिवसांपासून अंगणातील कचरा आणि नालीवरुन त्यांच्यात वाद होता. यापूर्वी अनेकदा त्यांच्यात याच कारणावरुन खटके उडत होते. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला व शे. करीम याच्यावर सुलतान खॉ याने काठी आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यात करीम बेशुध्द पडला. शेजारच्या लोकांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी मेराज अली यांनी मृत घोषित केले. याबाबची तक्रार मृताचा भाऊ शे. रहीम शे. उस्मान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुलतान खॉ हा पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलीस उपनिरीक्षक आखरे यांनी त्याला शिताफीने अटक केली. शे. करीम याचे पश्चात पत्नी, १ मुलगी असून त्याची पत्नी गंभीर आजाराने त्रस्त आहे. (शहर प्रतिनिधी)
कचरा उचलण्याच्या वादातून युवकाची हत्या
By admin | Updated: October 8, 2014 22:57 IST