तालुक्यात खळबळ : वाडेगाव येथील घटना, तक्रारकर्त्या भावाला अटक वरुड : नेहमीच उदभवणाऱ्या घरगुती वादातून लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावाची हत्या केली. ही घटना वाडेगाव येथे बुधवारी ४ जानेवारी रोजी घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मोठ्या भावाने वडिलांचा गळा दाबण्याच्या कारणावरून ही घटना घडल्याची परिसरात चर्चा आहे. घटनेच्या माहितीवरून वरूड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृताचे नाव सुधाकर गोमकाळे (४५ रा. वाडेगांव) असे आहे. तर आरोपीचे नाव गजानन गोमकाळे (४० रा.वाडेगांव) असे आहे. मृत आणि आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत होती. तर आठदिवसांपूर्वी सुद्धा दोघांमध्ये भांडण झाले होते. मात्र, गावकऱ्यांनी मध्यस्थी केल्याने ते भांडण सुटले. गोमकाळे कुटूंब मूळ राजूराबाजार येथील रहिवासी आहे. ६ वर्षांपूर्वी ते वाडेगावात स्थलांतरित झाले. वाडेगावात कुटूंबात आरोपी गजानन, वडिल आणि आईसह राहतो तर त्याचा मोठा भाऊ मृत सुधाकर गोमकाळे हा राजुराबाजार येथे वास्तव्यास होता. परंतु तो मद्यप्राशन करून वाडेगावला येऊन आई, वडिल आणि लहान भावाला त्रास देऊन सतत भांडण करीत होता. यापूर्वीसुध्दा भांडणे झाल्याने याबाबत वरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे मृत सुधाकरविरूद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. बुधवारी ४ जानेवारीला सुधाकर हा नेहमीप्रमाणे दारू ढोसून वाडेगावला आला आई-वडिलांसह लहान भावासोबत भांडण केले. इतकेच नव्हे तर बापाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याने लहान भावाचा राग अनावर होवून त्याने मोठ्या भावाला काठीने बेदम मारहाण केली. सुधाकर गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपीने वरूड पोलीस ठाणे गाठून आपण भावाला बेदम मारहाण केल्याची माहिती दिली. परंतु तोपर्यंत मोठया भावाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार देण्यास गेलेल्या आरोपी गजानन गोमकाळे याला पोलीस ठाण्यातच अटक करून त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनात वरूड पोलीस करीत आहेत. याघटनेमुळे वाडेगावात खळबळ उडाली आहे.
घरगुती वादातून भावानेच केली भावाची हत्या
By admin | Updated: January 6, 2017 00:28 IST