वरुड : शहरातील मुख्य मार्गावर बसणारी मोकाट जनावरे वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने अनेकवेळा अपघातसुध्दा घडले. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनसुध्दा नगरपरिषदेने लक्ष दिले नाही. युवक काँग्रेसच्यावतीने सात दिवसांचा अल्टिमेटम देऊनही कारवाई झाली नसल्याने अखेर युवक काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेमध्ये मोकाट जनावरे नेऊन सोडण्यात आली. मुख्याधिकारी लोहकरे यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीने करणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. आठ दिवसांत मोकाट जनावरांंचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे वर्धा लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांनी दिला.शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. अनेकवेळा अपघातही घडले आहेत. परंतु याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याने यावर कारवाई केली नाही. शहरातील जनावरांच्या मालकांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येऊन कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र कुणावरही कारवाई झाली नाही. जनावरांचा बंदोबस्तसुध्दा नगरपरिषदेकडून झाला नाही. याबाबत गत सात दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेला निवेदन देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करून जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर मोकाट जनावरे नगरपरिषद कार्यालयात सोडण्याचा इशारा दिला होता. पंरतु कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर मंगळवारी दुपारच्या सुमारास युवक काँग्रेसेच वर्धार् लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विक्रम ठाकरे, तालुकाध्यक्ष धनजय बोकडे, निसारभाई, किशोर गुल्हाणे, प्रमोद टाकरखेडे, राहुल चौधरी, दिनेश आंडे, शकील शहा, दीपक देशमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेमध्ये मोकाट जनावरांना आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्याधिकारी विजय लोहकरे तसेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मोकाट जनावरे आंत घेण्यास नकार दिला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विक्रम ठाकरेंसह आदी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)
वरुडातील मोकाट जनावरे सोडली नगरपालिकेत
By admin | Updated: September 17, 2015 00:15 IST