अमरावती : महापालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र १ जानेवारी २००६ ते ३० एप्रिल २०१० या ५४ महिन्यांच्या काळातील थकबाकी दिलेली नाही. याच्या निषेधार्थ व थकीत रक्कम त्वरित मिळावी, यासाठी महापालिका कर्मचारी संघाद्वारा शनिवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेद्वारा २९ व ३० सप्टेंबरला धरणे व निदर्शने करण्यात आली. आयुक्तांनी १३ आॅक्टोबरला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले मात्र आयुक्तच अनुपस्थित राहिले. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे वेळकाढू धोरण असल्याचा आरोप संघटनेद्वारा करण्यात आला. १४ आॅक्टोबरपासून कर्मचाऱ्यांद्वारा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश पांडे, कार्याध्यक्ष मानविराज दंदे, सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, उपाध्यक्ष किशोर संगेले, कमलाकर जोशी, डि. एस. खडेकर, मनोज इंगोले, विद्या बारसे आदी उपस्थित होते.
महापालिका कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक
By admin | Updated: October 16, 2016 00:16 IST