मालमत्ता करात सूट : चेतन पवारांचा पाठपुरावाअमरावती : महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व माजी सैनिकांना सुंदर अशी दिवाळी भेट देण्यात आली आहे. त्यांना महापालिकेच्या मालमत्ता करातून सूट देण्यात आली असून मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण राज्यात सैनिकांना मालमत्ता करातून सूट देऊन त्यांच्या सैन्य सेवेचा गौरव व्हावा म्हणून वारंवार तशी मागणी होत होती. उरी दुर्घटनेनंतर देशातील वातावरण निखळ देशभक्तीने भारलेले असतानाच महानगरपालिका प्रशासनाने त्या वातावरणास पोषक असा निर्णय घेतल्याने माजी सैनिकांचा आनंद व्दिगुणित झाला आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस फं्रटचे गटनेते तथा माजी उपमहापौर चेतन पवार यांनी हा प्रस्ताव आमसभेसमोर ठेवला होता. त्यानंतर जोरकस पाठपुरावा करून, त्याला आमसभेची मान्यतासुद्धा मिळवून घेतली होती, हे विशेष.यापुढे महापालिका परिक्षेत्रातील आजी - माजी सैनिक, सीमा सुरक्षा बल तसेच जीआरपीएफच्या जवानांना त्यांच्या एका मालमत्ता कराचे सामान्य करातून १०० टक्के सवलत चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून लागू करण्यात आलेली आहे. ही सवलत सैनिकांसोबतच त्यांच्या विधवा पत्नींनादेखील हयात असेपर्यंत लागू राहणार आहे. मात्र ही सवलत त्यांच्या अपत्यास लागू राहणार नाही. त्यासाठी सन २०१६-१७ पूर्वीच्या करांचा भरणा करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच सामान्य कर वगळून इतर सर्व करांचा भरणा करणे अनिवार्य राहील. सवलत मंजुरीसाठी संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे त्यासंबंधीच्या प्रतिज्ञालेखासह संबंधित महापालिका झोन कार्यालयाकडे व्यक्तिगत अर्जासह सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. आजी-माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती यांच्याकडील प्रमाणपत्र अर्जास जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महापालिकेची सैनिकांना दिवाळी भेट
By admin | Updated: October 30, 2016 00:10 IST