अमरावती : महापालिकेने अपंगाला व्यवसायासाठी दिलेले दुकान स्वत:चे बुलडोजर लावून उद्धवस्त केले. पाच वर्षांपूर्वी महापालिकेने शासनाच्या जीआरनुसार आबिद खान दाऊद खान या अपंग व्यक्तीला आरटीओ कार्यालयासमोर आयुक्ताच्या आदेशानुसार १२० फूट जागा दिली. अपंग व्यक्तीला २०० फूट जागा व्यवसायासाठी द्यावी, असा निकष आहे. त्यानुसार आबिद खान याने बाजूच्या ८० फूट जागेवर तात्पुरते बांधकाम केले होते व त्यासंदर्भात न्यायालयात केस सुरू होती. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना मनपाने स्वत: दिलेल्या १२० फूट जागेवरील बांधकाम उद्धवस्त केले. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता तसेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना बांधकाम पाडणे हा कोर्टाचा अवमान नव्हे काय? या विरोधात संबंधित अपंग युवकाने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर अतिक्रमण उद्धवस्त केल्यामुळे अपंग युवकाचे १ लाख रूपयांचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणामध्ये आयुक्तांनी लक्ष द्यावे व संबंधित अपंग युवकाला न्याय द्यावा ही विनंती आबिद खान याने केली आहे. संबंधित युवकाला न्याय न मिळाल्यास त्याने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
अपंगाला दिलेले दुकान महापालिकेनेच पाडले
By admin | Updated: September 29, 2014 00:35 IST