अमरावती : विविध मागण्यांसाठी १० दिवसांपासून आंदोलन करूनही हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशनच्या मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शनिवारी आंदोलनकर्त्यांनी मुंडण आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शनिवारी पाच आंदोलनकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. राज्य आस्थापनेवरील आरोग्य सेवकांच्या सेवाज्येष्ठतेचा विषय आठ महिन्यांपासून रेंगाळत असून तो निकाली काढावा, सातरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करा, कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रकरण निकाली काढा, कर्मचाऱ्यांचे वेतन पाच तारखेच्या आत नियमित व्हावे, भविष्य निर्वाह निधीची स्लिप दरवर्षी देण्यात यावी, मेळघाटातील कर्मचाऱ्यांना संवर्गनिहाय हार्डशिप भत्ता द्यावा, आरोग्यसेवक व पर्यवेक्षकांचे पद अधिग्रहीत करण्यात न आलेल्या ठिकाणी अधिग्रहीत करावी आदी त्यांच्या मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या बँक अर्ज प्रकरणाच्या अर्जावर अधिकाऱ्यांनी सही करावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनांतर्गत आज शनिवारी आंदोलनकर्त्यांनी मुंडन करून निषेध नोंदविला. तसेच न्यायाची मागणी केली.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर मुंडण
By admin | Updated: November 15, 2014 22:39 IST