खळबळ : जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनाअमरावती : दोन महिन्यांच्या बाळाला (मुलगी) रुग्णालयात सोडून मातेने पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे घडली. वरुड तालुक्यातील बेनोडा येथील रहिवासी कांता अशोक तायवाडे (४५) यांच्या मुलीला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी एक बुरखाधारी महिला दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन तेथे आली. बाहेर मुलगी उभी आहे. तिला घेऊन येते, तोवर बाळाला सांभाळा, असे सांगून तिने ते बाळ कांता तायवाडे यांच्याकडे दिले. परंतु एक तास उलटून गेल्यानंतरही ती महिला रुग्णालयात परतली नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही तिचा कोठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर तायवाडे यांनी घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करुन बाळाला तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या स्वाधीन केले आहे. शुक्रवारी बाळाला बालसुधार समितीकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या घटनेने जिल्हा स्त्री रूग्णालयात खळबळ उडाली होती.
दोन महिन्यांच्या बाळाला सोडून मातेचे पलायन
By admin | Updated: September 11, 2014 23:09 IST