अमरावती : दुचाकींवरुन अचानक आलेल्या माथेफिरु युवकांच्या एका टोळक्याने दस्तुरनगर चौकातील प्रतिष्ठानांवर हल्ला केला. दुकानांची तोडफोड, नागरिकांना गोटमार आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या गल्ल्याची लूट केली. युवकांच्या या कृत्याने दस्तुरनगर, यशोदानगर परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. नागरिकांची पळापळ सुरु झाली. प्रतिष्ठाने बंद केली गेली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड झाल्याची माहिती पसरल्यामुळे हा प्रकार करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनुसार, सुमारे १५ ते २० युवक दुचाकी वाहनांवर स्वार होऊन यशोदानगर चौकात दाखल झाले. त्यांनी यशोदानगर चौकात घोषणाबाजी केली. नागरिक दहशतीत; तगडी सुरक्षाअमरावती : त्यांच्या हातात काठ्या आणि मोठमोठे दगड होते. यशोदानगर चौकातील प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करुन हा ताफा दस्तुरनगर मार्गाकडे वळला. दरम्यान या युवकांनी मार्गावरील एसबीआय एटीएम केंद्राच्या काचा फोडल्या. त्यानंतर रॉयल ट्रॅव्हल्स, एस.एम. मेडिकल, मनीष वस्त्रालय, सुमित्रा स्टील या दुकानांची तोडफोड करुन दुकानातील साहित्याची रस्त्यावर फेकाफेक केली. त्यानंतरही या युवकांचे समाधान न झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेले फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि चाट भंडारच्या हातगाड्या उलथविल्या. नंतर दस्तुरनगर चौकात त्यांनी मोर्चा वळविला. येथील जयगुरु टी स्टॉल, स्रेह पान मंदिर, महारुद्र पान मंदिरातील साहित्याचे नुकसान करुन दुकानदारांनाही मारहाण केली. दरम्यान यशोदानगर ते दस्तुरनगर मार्गावरील भेदरलेल्या व्यापाऱ्यांनी लगेच आपापली प्रतिष्ठाने बंद केली. परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण होते. या घटनेची माहिती मिळताच ताफ्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनीही भेट दिली. क्युआरटी तैनात करण्यात आली. घटनेची चर्चा पसरल्यावर रात्री उशीरापर्यंत नागरिक रस्त्यावर आल्याने स्थिती तणावपूर्ण होती. मोतीनगर, यशोदानग, दस्तुरनगर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त आहे.
माथेफिरुंचा हल्ला- तोडफोड, मारहाण अन् लुटमारही
By admin | Updated: November 6, 2014 00:48 IST