पालकांमध्ये रोष : तुकड्या वाढविण्यास शासनाचा नकारमोर्शी : तालुक्यात यावर्षी इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षणाकरिता नवीन महाविद्यालय, अतिरिक्त तुकड्या न देण्याची शासनाची भूमिका असल्याने बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळी २०१५ च्या शालांत परीक्षेत मोर्शी तालुक्यातून २५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबतच आॅक्टोबर २०१४ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी वर्ग ११ च्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. दोन वरिष्ठ महाविद्यालयांना आणि ११ शाळांना कनिष्ठ महाविद्यालयांच्या ११ वी व १२ वी च्या तुकड्या जोडण्यात आल्यात. या दोन वरिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य विज्ञान शाखेत ८०० विद्यार्थ्यांच्या वर्ग ११ मधील प्रवेशाची सोय आहे. तसेच शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांंना देण्यात आलेल्या प्रवेशक्षमतेनुसार ५०० विद्यार्थी वर्ग ११ वी मध्ये प्रवेश घेऊ शकतात. एकूणच १३ कनिष्ठ महाविद्यालयांत जास्तीत जास्त १३०० विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे १० वी उत्तीर्ण झालेले जवळपास १२०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शहरातील दोन्ही वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यां सोबतच पालकसुद्धा पाल्याच्या प्रवेशाकरिता वणवण भटकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांची शहरात शिक्षण घेण्याची ऐपत नाही त्यांची चांगलीच फजिती होत आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रथम वर्षाचेही तसेच तालुक्यातील एकूण १३ कनिष्ठ महाविद्यालयांतून १६२२ विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. स्थानिक आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखा, भारतीय महाविद्यालयातील कला, वाणिज्य शाखेच्या निर्धारित प्रवेशक्षमते अंतर्गत ५८० विद्यार्थ्यांंना प्रवेश मिळू शकतो. इतर शाखा, अभ्यासक्रमाकरिता तालुक्याबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० जरी अपेक्षित धरली तरी जास्तीत जास्त ८०० विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न सुटू शकतो; तथापि जवळपास ८०० विद्यार्थी मात्र उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांनी जायचे कोठे, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. नवन्ीा तुकड्या न देण्याचे धोरण : राज्य शासनाने मे महिन्यात निर्णय घेऊन राज्यातील कोणत्याही महाविद्यालयांना नवीन वर्ग तुकड्या, अभ्यासक्रम, विषय, नवीन महाविद्यालये यावर्षी न देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे मागील वर्षी बृहद आराखड्याप्रमाणे राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेले नवीन तुकड्या, अभ्यासक्रम, विषय, महाविद्यालयांचे प्रस्ताव शासनाने रद्द ठरविले आहे. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात तरी नवीन तुकड्या महाविद्यालयांना मिळणार नाहीत. त्यामुळे शालांत आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.
महाविद्यालयीन प्रवेशापासून मोर्शीतील विद्यार्थी वंचित
By admin | Updated: July 6, 2015 00:13 IST